(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे दरे या मूळ गावी, गावकऱ्यांकडून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक
मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आपल्या दरे या मूळ गावी आले. यावेळी गावकऱ्यांनी धुमधडाक्यात त्यांचे स्वागत केले.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आपल्या दरे या मूळ गावी आले. रात्री उशीरा मुख्यमंत्री शिंदे हे गावात पोहोचले. मात्र, गावकऱ्यांनी धुमधडाक्यात त्यांचे स्वागत केले. दरे गावाच्या वेशीपासून गावापर्यंत एकनाथ शिंदे यांची ढोल ताशांच्या तुतारीच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. मुख्यमंत्री झालेला आपल्या गावचा सुपुत्र गावात येणार म्हटल्यानंतर गावातल्या लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे गावात आगमन झाल्यानंतर त्यांच्या गाडीवर फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला.यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सून नातू सर्व कुटुंब उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच आपल्या मुळ दरे या गावी आले. तापोळ्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात आले. जोरदार वारे आणि तुफान पाऊस असतानाही मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
पावसाळी अधिवेशनापुर्वी एकनाथ शिंदे यांनी ग्रामदैवत आणि कुलदैवताचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री झाल्याबद्दल दरे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कारही करण्यात येणार आहे. आज (12 ऑगस्ट) दुपारी 1 वाजता ते दरे येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) गावचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या रुपाने साताऱ्याचा चौथा सुपुत्र मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आहे. त्यांच्या निवडीमुळे महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाची देशभर चर्चा
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तब्बल 40 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळं शिवसेनेत फूट पडली. शिंदे यांच्या भूमिकेनंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. अखेर भाजप (BJP) आणि शिंदे गटाने राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रिक्षा चालक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा एकनाथ शिंदे यांचा प्रवास मोठा रंजक आहे. एकनाथ शिंदे यांची सध्या राज्यभर नाहीतर देशभर चर्चा पसरली आहे. कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आनंद दिघे यांच्या तालमित घडलेले एकनाथ शिंदे मागील अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Independence Day 2022 : स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी 19 जिल्ह्यांना 19 मंत्री, इतर ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
- Shivsena : विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीवर सुनिल प्रभू, अजय चौधरींची निवड करा: शिवसेनेचे अध्यक्षांना पत्र