Devendra Fadnavis on Phaltan Doctor: फलटणमध्ये डॉक्टर तरुणीचा मृत्यू, भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis on Phaltan Doctor Suicide: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावर टीका होत आहे.

Devendra Fadnavis on Phaltan Doctor Suicide: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या डॉक्टर तरुणीने मृत्यूपूर्वी हातावर सुसाईड नोट (Suicide News) लिहून ठेवली होती. त्यामध्ये पोलीस अधिकारी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते. गोपाळ बदने (Gopal Badne) आणि खासदारांच्या पीएकडून रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या आरोपींना फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणला जात असल्याची तक्रारही या तरुणीने केली होती. या तरुणीने केलेल्या तक्रारीत खासदाराचा उल्लेख असल्याने त्याचा संबंध भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांच्याशी जोडला जात आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन भाजपला कोंडीत पकडले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणात योग्य ती कारवाई होईल, असे आश्वासन दिले. ते शनिवारी मुंबईत हिंद-दी-चादर’ श्री गुरुतेगबहादूर साहिबजी 350 वा शहीदी समागम राज्यस्तरीय कार्यशाळा कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांनाही चपराक लगावली.
फलटणच्या रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला विरोधी पक्षांकडून जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. हे करणं योग्य नाही. मी एवढे मी स्पष्टपणे सांगतो की, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष यामध्ये कोणीही यामध्ये सहभागी आहे, असा पुरावा मिळाला तर आम्ही त्याला सोडणार नाही. पण या घटनेचे राजकारण करु नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावर आता विरोधक काय बोलणार, हे पाहावे लागेल. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर आहेत. यावेळी ते या प्रकरणावर आणखी सविस्तर भाष्य करण्याची शक्यता आहे.
Satara News: रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी डॉक्टर तरुणीला फोन केल्याचे आरोप फेटाळले
मृत डॉक्टर तरुणीने सुसाईड नोटमध्ये जो खुलासा केला आहे, त्यामध्ये खासदार महोदयांचा फोन आला, अशी माहिती आहे. दैनंदिन जीवनात मी अनेकांना फोन करतो. पण महिला डॉक्टरने तिच्या चॅटमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की, खासदारांनी मला दम दिला, रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दम दिला किंवा खासदारांच्या पीएने दम दिला. खासदारांनी केवळ माहिती घेतली एवढंच या तरुणीने आपल्या पत्रात म्हटले आहे. मी कधीही त्या मुलीला फोन केला नाही. त्यासाठीच मी काल सीडीआर तपासण्याची मागणी केली. मृत डॉक्टर महिलेने स्वत: दोन आरोपींची नाव घेतली आहेत. मी दररोज तालुक्यातील सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलत असतो. पण त्या मुलीशी बोलल्याचं मला आठवत नाही. दिवसभरात अनेकांशी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असल्याने कधी डॉक्टर महिलेशी फोन झाला असेल तर मला आठवत नाही. पण तरुणीने म्हटल्याप्रमाणे, खासदारांनी तिला पोलिसांची तुमच्याविषयी तक्रार आहे का? असे विचारले जरी असेल तर यामध्ये गैर काय आहे? पण मला असा कोणताही फोन झाल्याचे आठवत नाही, असे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
डॉक्टर तरुणीच्या शारीरिक छळाचा आरोप असलेल्या गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला....
























