Sangli News: सांगलीच्या खासदाराचे टार्गेट फक्त प्रॉपर्टी वाढवण्याचे, या खासदाराला पाडायची वेळ आली; विशाल पाटलांचा हल्लाबोल
प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महानिर्धार मेळाव्यात दमदार भाषण केले. यावेळी त्यांनी विश्वजीत कदम यांचे नेतृत्व मान्य करत विश्वजीत कदम यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही दिली.
Sangli News: प्रदेश काँग्रेसकडून आज सांगलीमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ बैलगाडीची प्रतिमा भेट देत महाराष्ट्र काँग्रेसकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा सत्कार करण्यात आला. घोंगेंडे आणि तुळशी हार घालून सोलापूर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांनी सत्कार केला. दरम्यान, या मेळाव्यात बोलताना वसंतदादा पाटील यांचे नातू आणि प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महानिर्धार मेळाव्यात दमदार भाषण केले. यावेळी त्यांनी विश्वजीत कदम यांचे नेतृत्व मान्य करत विश्वजीत कदम यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही दिली. विशाल पाटील यांनी बोलताना भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
टार्गेट फक्त प्रॉपर्टी वाढवण्याचे
यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले की, सांगलीच्या खासदाराचे टार्गेट फक्त प्रॉपर्टी वाढवण्याचे आहे. आता या खासदाराला पाडायची वेळ आली आहे. दुसरीकडे, विश्वजित पाटील यांनी बोलताना दुष्काळी जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असलेल्या सीमावर्ती भागाला पाणी द्यावे, अशी मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे केली. कर्नाटकचा निकाल लागला तसाच 2024 मध्ये महाराष्ट्रचा निकाल लागणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजपला हाकलून लावले, असेही कदम म्हणाले. मराठी भाषिकांना सांभाळा, त्यांना न्याय द्या, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, काँग्रेसकडून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी सांगली कोल्हापूर तसेच कर्नाटकमधून हजारोंच्या संख्येने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आले आहेत. हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या निमित्ताने सांगलीत एकवटले आहेत. त्यामुळे या शक्तीप्रदर्शनातून सांगली लोकसभा मतदारसंघाचे एकप्रकारे रणशिंग फुंकलं गेलं आहे.
कन्नड भाषेत पोस्टर झळकावले
दुसरीकडे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या काँग्रेसच्या महानिर्धार मेळाव्यात जत तालुक्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांनी कन्नड भाषेत पोस्टर झळकावत अनेक मागण्या केल्या. कर्नाटकातून सीमाभागातील तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी मिळावे, अशी सिद्धरामय्या यांना विनंती करणारे पोस्टर सीमाभागातील लोकांनी झळकवले. तसेच कर्नाटकात पावसाळ्यात महाराष्ट्रमधून तुम्हाला पाणी दिले जाते. तुम्ही उन्हाळ्यात जत तालुक्यातील सीमावर्ती भागाला पाणी द्यावे, अशीही मागणी केली. कर्नाटक सीमेवरील शेतकरी वर्गाला नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळावं अशीही मागणी केली.
इतर महत्वाच्या बातम्या :