Sikandar Shaikh : सांगलीतील कुस्ती मैदानात सिकंदर शेखने एका मिनिटात गोपी पंजाबला दाखवलं अस्मान!
सांगलीत (Sangli News) कृष्णा काठावर पार पडलेल्या कुस्ती मैदानामध्ये महान भारत केसरी सिकंदर शेखने (Sikandar Shaikh) अवघ्या एक मिनिटात मैदान मारताना गोपी पंजाबला अस्मान दाखवले.
Sikandar Shaikh : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांगलीत (Sangli News) कृष्णा काठावर पार पडलेल्या कुस्ती मैदानामध्ये महान भारत केसरी सिकंदर शेखने (Sikandar Shaikh) अवघ्या एक मिनिटात मैदान मारताना गोपी पंजाबला (Gopi Punjab) अस्मान दाखवले. रोमहर्षक अशा झालेल्या कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेखने पंजाबाच्या भारत केसरी गोपी पंजाबला चितपट केले. यामध्ये पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा पैलवान गुरुप्रीत सिंग उर्फ गोपी पंजाब यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती पार पडली. ज्यामध्ये एकचाक डावावर सिकंदर शेखने गोपी पंजाबला अस्मान दाखवत छत्रपती शिवाजी महाराज चषक पटकावला. ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.
काही सेकंदांमध्ये खडाजंगी होते ना होते तोवर मैदान मारले
बाजीगर पैलवान सिकंदर शेख (Sikandar Shaikh) सांगलीचं मैदान मारणार का? याचे उत्तर अवघ्या एका मिनिटात दिले. त्याच्याशी लढायला पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या गोपी पंजाबला एकचाक डावावर हरवत सिकंदरने कुस्ती शौकिनांची शाबासकी मिळवली. अडीच लाख रुपये रोख आणि छत्रपती शिवाजी महाराज चषक कोण जिंकणार याची उत्सुकता असलेल्या कुस्ती शौकिनांनी या कुस्तीसाठी तुफान गर्दी केली होती. रात्री साडेदहाला ही कुस्ती सुरु झाली आणि काही सेकंदांमध्ये खडाजंगी होते ना होते तोवर अवघ्या मिनिटांमध्ये सिकंदर मैदान मारले. हनुमंत जाधव यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.
सांगलीने नेहमीच जात-पात न पाहता खेळाडूंना प्रोत्साहन दिलं
सांगलीने नेहमीच जात-पात न पाहता खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आहे आणि मला देखील नेहमीच सांगलीकरांनी जास्त प्रेम दिले अशा भावना यावेळी सिकंदरने व्यक्त केल्या. ट्रबल शुटींग सोशल वेलफेअर फौंडेशन व कुस्ती प्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कृष्णा घाटावरील आयर्विन पुलाशेजारी भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये छोट्या-मोठ्या अशा 100 कुस्त्या पार पडल्या.
सिकंदर ठरला 'भीमा केसरी'चा मानक
दुसरीकडे, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या 'भीमा केसरी' स्पर्धेत सिकंदर शेखने पंजाबच्या भूपेंद्रसिंहला आस्मान दाखवलं होतं. महाराष्ट्र केसरीप्रमाणे भव्यरितीने आयोजित केलेल्या या भीमा केसरी स्पर्धेकडे सिकंदर आणि महेंद्रच्या उपस्थितीमुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. तत्पूर्वी, सिंकदरने सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील 'विसापूर केसरी'चे मैदान मारलं होतं. त्यावेळी सिकंदरने मोळी डावावर पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला लोळवले होते.
इतर महत्वाच्या बातम्या