Anil Babar : आजचा निकाल हा श्रीरामाचाच आशीर्वाद, शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची प्रतिक्रिया
Shivsena MLA Disqualification Verdict : आम्ही बंड केलं नव्हतं, पक्ष हा कोणा एकाच्या मालकीचा कधीच होऊ शकत नाही तर जनता हे ठरवत असते असं शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर म्हणाले.
सांगली : पक्ष कोणा एकाच्या मालकीचा नाही, तर जनतेचा आहे, आम्ही घेतलेल्या भूमिकेवर विधानसभा अध्यक्षांनी कागदपत्रांच्या आधारे शिक्कामोर्तब केले असून आजचा निकाल हा श्रीरामाचाच आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी निकालानंतर दिली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आज दोन्ही गटांच्या आमदारांची अपात्रतेची याचिका फेटाळली आणि शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला. त्यानंतर बाबर यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आमदार अनिल बाबर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून आमची वाटचाल सुरूच राहील. मागील अडीच वर्षात करोना संकटाचे कारण पुढे करून घरी बसून राज्य चालवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आताही सरकारपुढे संकटे आली, मात्र न डगमगता सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.
आमचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल या अगोदरच निवडणूक आयोगाने दिला आहे, आता यावर विधानसभा अध्यक्षांनी मोहोर उमटवली आहे असं अनिल बाबर यांनी सांगितलं. ते म्हणाले की, आम्ही बाजूला झालो ते केवळ पक्षावर जनतेने व्यक्त केलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठीच. यामुळे त्याला बंड म्हणता येणार नाही. पक्ष हा कोणा एकाच्या मालकीचा कधीच होऊ शकत नाही तर जनता हे ठरवत असते.
अनिल बाबर म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. विरोधात निकाल दिला तर न्यायालयात जाण्याचे इशारे देण्यात आले. मात्र आता आम्ही या सर्वाना सामोरे जाण्यास तयार आहे. आमची बाजू सत्याची, जनतेची आहे, त्यामुळे आजच्या निकालाचा कोणताही ताण अथवा तणाव आमच्यावर नव्हता. राज्याचा विकास झाला पाहिजे, सामान्य जनतेला न्याय मिळायला हवा ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊनच आमची पुढची वाटचाल राहील. निकाल जाहीर होण्यापुर्वी काही मंडळी आम्ही जनतेच्या दारात जाऊ असे सांगत होते. आता त्यांनी जनतेच्या दारातच न्यायासाठी जावे. आमची त्याला तयारी आहे. जनता जनार्दनच अखेर कोण सत्य कोण असत्य हे सांगेल.
ठाकरेंना धक्का, शिवसेना शिंदेंचीच
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन आज पार पडलं. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवला. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला.
उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केली. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत.
दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. आजच्या निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच कालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केला. दरम्यान निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.
ही बातमी वाचा: