Sangli News : कपडे धुण्यासाठी कृष्णा नदीत उतरलेले पाच परप्रांतीय कामगार बुडाले; तिघांना वाचवण्यात यश
मिरज-मालगाव रस्त्यावर दत्तनगरमध्ये भाड्याने वास्तव्यास असलेल्या राजस्थानमधील फरशी बसविण्याचे काम करणारे सहा कामगार कपडे धुण्यासाठी कृष्णा घाटावर गेले होते. यापैकी पाच जण पाण्यात उतरले होते.
सांगली : कपडे धुण्यासाठी कृष्णा नदीत उतरलेले पाच परप्रांतीय कामगार बुडाल्याची घटना मिरजेतील कृष्णा घाटावर घडली. यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला तर एकजण अद्याप बेपत्ता आहे. मिरज-मालगाव रस्त्यावर दत्तनगरमध्ये भाड्याने वास्तव्यास असलेल्या राजस्थानमधील फरशी बसविण्याचे काम करणारे सहा कामगार कपडे धुण्यासाठी कृष्णा घाटावर गेले होते. यापैकी पाच जण पाण्यात उतरले होते.
कपडे धूत असताना यापैकी पाच जण पाण्यात बुडाले. बुडालेल्यांपैकी तिघांना वाचविण्यात ओम पाटील या तरूणाला यश आले. मात्र, रामस्वरूप यादव (वय 23) आणि जितेंद्र यादव (वय 21) हे दोघे वाहत्या पाण्यात बेपत्ता झाले. सदरची घटना समजताच महापालिकेचे अग्निशमन दल, आयुष सेवाभावी संस्था व वजीर बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शोध पथकाला रामस्वरूप यादव याचा मृतदेह हाती लागला असून दुसरा बेपत्ता झालेला जितेंद्र यादव मात्र अद्याप हाती लागलेला नाही.
कृष्णा नदी पात्रात मगर आणि तरुणाचा आमने-सामने थरार
दरम्यान, सांगलीमध्ये कृष्णा नदीपात्रात पोहणाऱ्या तरुणाचा आणि मगरीचा थरारक सामना काल (12 सप्टेंबर) पाहण्यास मिळाला होता. सुदैवाने पोहणारा तरुण जवळ येताच मगरीने तळ गाठल्याने बचावला. नदीत पोहण्यासाठी तरुण रोज असतात. राजदीप कांबळे सांगलीवाडीच्या बाजूने बायपास पूलाकडून समर्थ घाटाकडे पोहत येत होता. याच दरम्यान सांगलीवाडीकडून महाकाय मगर संथ विहार करीत मध्यभागी येत होती. दोघेही एकमेकांकडे येत असल्याचे काठावरील नागरिकांना दिसत होते. पोहणाऱ्याला ओरडून, शिट्ट्या वाजवून सावध करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तरुणाची मगरीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याने काठावरून प्रचंड आरडाओरड सुरू होती. पात्राच्या दोन्ही टोकावरून आवाज कानी येत होता. मात्र, तरुणाने कानात एअर प्लग घालून पाण्यात मान खाली घालून पोहत असल्याने लोकांचा आवाज त्यांच्या कानावर पोहोचलाच नाही. तसेच समोरून अजस्त्र मगर येत आहे याचीही त्यांना माहिती नव्हती. पोहण्यात गुंग असतानाच जवळ येताच मगर पाण्यात खाली गेली. वरुन तरुण पोहत निघून गेल्याने लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. मगर आणि तरुण जवळ येताच थरारक दृष्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, डोळ्याचे पाते लवते न लवते एवढ्या काळात मगरीने डुबकी मारत तळ गाठला. तरुण काही घडलेच नाही असे समजून तीरावर आला.
इतर महत्वाच्या बातम्या