Sangli News : उपोषणावरून दोन पाटलांमध्ये हल्लाबोल, तिकडं अनिल बाबरांनी मंजूरीचे पत्रच आणले; सांगलीत पाण्यावरून राजकारण पेटले! सुमनताई कोणती भूमिका घेणार?
दोन पाटलांमध्ये खडाजंगी सुरू असतानाच आता शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी टेंभू पाणी योजनेसाठी अंतिम मंजुरी आणल्याने दोन पाटलांच्या वादात उडी न घेता थेट मंजूरी आणली आहे.
सांगली : तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील (MLA Sumantai Patil) यांनी सावळजसह परिसरातील आठ गावांच्या पाणी प्रश्नासाठी आजपासून सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्यासोबत रोहित पाटील (Rohit Patil) सुद्धा उपोषणाला बसणार होते. यानंतर भाजप खासदार संजयकाका पाटील (Sanjay kaka Patil) यांनी आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला होता. या दोन पाटलांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतानाच खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांनी मोठी खेळी करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टेंभू योजनेच्या विस्तारासाठी मंजूरी आणल्याने एकप्रकारे उपोषणाला शह दिला आहे. त्यामुळे टेंभूच्या पाणी योजनेवरून सांगलीत राजकारण चांगलेच पेटले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सावळजसह परिसरातील आठ गावे टेंभू पाणी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेच्या अहवालास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन या आठ गावांचा योजनेमध्ये समावेश व्हावा यासाठी आजपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सुमनताई पाटील यांनी दिला होता. यानंतर सुरू झालेल्या राजकारणात भाजप खासदार संजय काका पाटील यांनी सुमनताई पाटील यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला होता. तुमच्या राजकीय अपयशाची कबुली असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला होता. तसेच पुत्रप्रेमापोटी सुमनताई आंधळ्या झाल्या आहेत, असाही आरोप त्यांनी केला होता.
या दोन पाटलांमध्ये खडाजंगी सुरू असतानाच आता शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी टेंभू पाणी योजनेसाठी अंतिम मंजुरी आणल्याने दोन पाटलांच्या वादात उडी न घेता थेट मंजूरी आणली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टेंभूच्या पाण्यावरून चांगलाच वाद पेटला आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच मंजूरीचे पत्र
दुष्काळी खानापूर आटपाडी विसापूर सर्कल या तालुक्यातील वंचित गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी आमदार अनिल बाबर यांनी पाठपुरावा सुरू केला होता. टेंभू योजनेच्या विस्तारित योजनेसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी टेंभू योजनेच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) कॅबिनेटमध्ये आणून लवकरच मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे एका बाजूला संजय काका पाटील आणि रोहित पाटील तसेच सुमनताई पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच अनिल बाबर यांनी थेट मंजुरी आणत आमदार सुमनताई पाटील यांच्या उपोषण आंदोलनातून हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
रोहित पाटलांकडून संजय पाटलांना प्रत्युत्तर
संजय काका पाटील यांनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी केल्यानंतर रोहित पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. टेंभू योजनेच्या पाण्यासाठी आमदार सुमनताई पाटील या उपोषण करणार आहेत. निवडणुका पाहून काम करणं ही आर. आर. कुटुंबियांची वृत्ती नाही, अशा शब्दांमध्ये संजय पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार रोहित पाटील यांनी घेतला. ते पुढे म्हणाले की, आम्ही नौटंकी करतोय असं म्हटलं जात आहे. हा पाण्याचा विषय आहे यावर आम्हाला राजकारण करायचं नाही. विरोधकांना अजिबात बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं, पण काही लोक वल्गना करत आहेत असेही ते म्हणाले. प्रत्येक प्रश्नासाठी आर. आर. आबांच्या कुटुंबाने त्यांच्या पश्चात सुद्धा कसं काम केले आहे हे प्रत्येक कुटुंबानं पाहिलं आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या