Sangli News : तासगावातील मणेराजुरीत बोगस खत कंपनीचा पर्दाफाश, साडेसात लाखाचं 37 टन खत जप्त, दोघांवर गुन्हा
कृषी विभागाने सांगलीतील बोगस खत कंपनीचा पर्दाफाश केला आहे. तासगावातील मणेराजुरी गावात टाकलेल्या छाप्यात 7 लाख 38 हजार रुपये किमतीचे 36.90 टन खत जप्त करण्यात आलं. तसंच दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सांगली : सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी इथे रासायनिक खतांचा साठा करुन ते बोगस कंपनीच्या पोत्यात भरुन विकणाऱ्या कंपनीचा कृषी विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात 7 लाख 38 हजार रुपये किमतीचे 36.90 टन खत जप्त करण्यात आलं. याप्रकरणी मुजाहिद मुबारक मुजावर (वय 25 वर्षे) आणि रमजान मन्सूर मुजावर (वय 27 वर्षे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वेगवेगळ्या कंपन्यांची खते गोदामात आणली जात होती. तिथे नवीन पोती भरुन पुन्हा त्यांची विक्री करण्याचे रॅकेट सुरु होतं. पॅकिंग होणाऱ्या नवीन पोत्यांवर गुजरातचा पत्ता असल्याचं उघडकीस आलं आहे.
मणेराजुरी ते तासगाव रस्त्यालगत जमदाडे मळ्यात एका पोल्ट्रीच्या शेडमध्ये बनावट खत कंपनीचे पॅकिंग करुन खत विकले जात असल्याची माहिती कृषी विभागास मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी दोनच्या सुमारास सुरेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधिकारी डी. एम. पाटील, तालुका कृषी अधिकारी एस. के. अमृतसागर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी जी. एल. ऐनवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे भगवान पालवे आणि त्यांच्या पथकाने खतांचे बोगस पॅकिंग सुरू असलेल्या गोदामावर छापा टाकला. यावेळी बेकायदेशीर खतांची पोती उतरण्याचे काम सुरु होते.
स्थानिक कामगारांकडून ट्रकमधून खत उतरवलं जात होतं. 18:18:18, 17:17:17, 24:24:24, 20:05:20, ऑरगॅनिक मन्युअर यांसह अन्य लेबल असलेली पोती भरली जात होती. तिथे पोती सीलिंग मशीन, नॅचरल पोटॅशची 50 किलोची 90 पोती, बेटानाईट गोळीची 50 किलोची 25 पोती, लेबल नसलेली 50 किलोची 623 पोती असं एकूण 36.90 टन खत जप्त करण्यात आलं.
वेगवेगळ्या कंपन्यांचं खत भेसळ करुन बनावट कंपनीच्या पोत्यांमध्ये पॅकिंग करुन विकण्यासाठी वापरात येणारं गोदाम पूर्वी पोल्ट्रीचं शेड होते. याच शेडचा वापर बोगस खत विक्रीसाठी करण्यात येत होता. शेडमालक युनूस शेख यांच्याकडून मुजाहिद मुजावर आणि रमजान मुजावर यांनी भाड्याने शेड घेऊन बोगस खत कारखाना सुरु केला होता. तिथून सात लाख 38 हजार रुपये किमतीचं खत जप्त करुन मुजाहिद मुजावर आणि रमजान मुजावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.