Sanjay Raut In Sangli : जे कसब्यात झालं तेच सांगली मिरजेत 2024 मध्ये होईल; संजय राऊतांचा विश्वास
Sanjay Raut : आम्ही भाजपला मिरज मतदारसंघ सोडायला नको होता, अशी कबूली त्यांनी यावेळी दिली. सांगली महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी खोके घेतल्याचाही आरोप संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut In Sangli : सांगली आणि कोल्हापूरमध्ये जे स्वागत झालं ते माझं नव्हे, तर शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांचं असल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. राऊत यांचा शिवगर्जना मेळावा सांगलीत पार पडला. यावेळी त्यांनी शिंदे गट, निवडणूक आयोग आणि भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी शिंदे गटावर प्रहार करताना राऊत यांनी निवडणूक आयोगाला अपशब्द वापरल्याने मुद्दा एकदा वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, आम्ही भाजपला मिरज मतदारसंघ सोडायला नको होता, अशी कबूली त्यांनी यावेळी दिली. सांगली महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी खोके घेतल्याचाही आरोप संजय राऊत यांनी केला. टक्केवारीसाठी मारामारी होत असल्याचे ते म्हणाले. मिरजेत रस्ते नसल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगावर प्रहार
ते म्हणाले की, शिवसैनिकांनी उपाशी राहून, चटणी भाकर खाऊन यांना निवडून दिले, आमदार, खासदार, मुख्यमंत्री केले. आणि तुम्ही ज्यांना निवडून दिले 50-50 खोके घेऊन पळून गेले. आणि निवडणूक आयोग सांगतोय त्यांची शिवसेना त्यांची आहे. तुमच्या बापाची आहे का शिवसेना? XXXX ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे का? आता मी जे काही बोललो तो असंसदीय शब्द आहे, पण संताप आहे. ही शिवसेना बाळासाहेबांची आहे. मराठी माणसासाठी काम करत राहिली. सामान्यांना पदे दिली. ही ताकद शिवसेना चार शब्दांची आहे. काय संबंध आहे शिंदे आणि त्यांच्या 40 चोरांची? आपली शिवसेना आयोगाने उचलून घशात आणि खिशात घातली. तेव्हापासून महाराष्ट्रात संताप आहे. त्या संताप 40 गद्दार आणि भाजप जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही.
जे कसब्यात झाले ते 2024 मध्ये सांगली आणि मिरजेत होईल
दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतूनही हल्ला चढवला. ते म्हणाले की, जे कसब्यात झाले ते 2024 मध्ये सांगली आणि मिरजेत होईल. सांगलीत प्रवेश करताना सर्व जाती धर्माचे आणि मुस्लिम बांधवांनी घोषणा देऊन स्वागत केले. जे कसब्यात झालं ते सांगली मिरजेत 2024 मध्ये होईल. खासकरून मुस्लीम बांधवांनी जोशात स्वागत केलं. मोठ्या प्रमाणात शिवसेनेबरोबर दिसले. हेच चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसले. अठरा पगड जातीने उद्धव ठाकरेंची खरी शिवसेना मानली आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा कागदावरचा आहे. खरी शिवसेना कोणाची हे ठरवायचं असेल, तर निवडणुकीला समोरे जायला तयार व्हा, खरी शिवसेना जनता ठरवेल.
त्यांनी पुढे सांगितले की, कसबा भाजपचा बालेकिल्ला होता, पण भाजपचा विजय शिवसेनेच्या मदतीने होत होता. तिथं 35 ते 40 हजार मतदान शिवसेनेचं आहे. ज्यांना तुम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं त्या पक्षाची मते का कसब्याच्या निवडणुकीमध्ये पडली नाहीत? शिवसेना सोबत असती, तर भाजपचा मतदार जिंकला असता. निवडणूक आयोगाचा निर्णय पटलेला नाही, सर्व लोक सांगताहेत हा अन्याय आहे. बाळासाहेबांची शिवसेना दुसऱ्याची कशी होऊ शकते?
इतर महत्वाच्या बातम्या