(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Crime : मिरजेत ॲक्सिस बँकेच्या 10 ग्राहकांची 90 लाखांची फसवणूक करून फरार झालेल्या सेल्स ऑफिसरच्या मुसक्या आवळल्या
Sangli Crime : ॲक्सिस बँकेतील नऊ ग्राहकांना सुमारे 90 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकणी बँकेचा संशयित कर्मचारी तोहीद शरीकमसलतला मिरज शहर पोलिसानी अटक केली आहे.
Sangli Crime : मिरजेतील बँकेतील ग्राहकांचा मोबाईल क्रमांक बदलून इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पैसे इतर खात्यांवर वळवून ॲक्सिस बँकेतील नऊ ग्राहकांना सुमारे 90 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकणी बँकेचा संशयित कर्मचारी तोहीद शरीकमसलतला मिरज शहर पोलिसानी अटक केली आहे. त्याने 90 लाख, 61 हजार, 128 रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.
ॲक्सिस बँकेत खाते उघडून देण्याचे काम करणाऱ्या तोहिदने खातेदारांशी चांगली ओळख करत म्युच्युअल फंडसह बँकेच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. मला नोकरीत बढती मिळविण्यासाठी ठेवीदारांची गरज असून, काही कालावधीसाठी बँकेत ठेवी ठेवा, असे सांगून त्याने अनेक ग्राहकांचा विश्वास संपादन केला. या दरम्यान, काही खातेदारांच्या बँक खात्यांचा मोबाईल क्रमांकही परस्पर बदलला. बदलेल्या मोबाईल क्रमांकावरुन त्याने इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून खातेदारांच्या खात्यावरील रक्कम आपल्या मित्रांच्या खात्यावर वळती केली. सदर रक्कम परस्पर काढून घेऊन या कर्मचाऱ्याने पलायन केले होते.
रक्कम परस्पर काढून फसवणूक
बँक ग्राहक अमिना नजीर अहमद शेख यांच्या खात्यावरील (6 लाख रुपये), गणी गोदाड (12 लाख), हुसेन बेपारी (23 लाख), शिराज कोतवाल (23 लाख), वाहिद शरीकमसलत (11 लाख), मेहेबूब मुलाणी (2 लाख), रमेश सेवानी (16 लाख) आणि अनिल पाटील (2 लाख) अशा नऊ खातेदारांच्या खात्यावरील 90 लाखांची रक्कम परस्पर काढून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित बँक ग्राहकांनी पोलिसात धांव घेऊन तक्रार दिली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी मंगळवारी त्याला ताब्यात घेऊन रात्री उशिरा अटक केली. तसेच बँक प्रशासनाकडूनही पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती.
कर्मचाऱ्याला बँकेतील अधिकारीच पाठीशी घालत असल्याचा आरोप
मात्र, बरेच दिवस झाले तरी संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. तसेच ग्राहकांना फसवणुकीचे पैसे परत देण्यासही बँक व्यवस्थापनाने नकार दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी बँकेसमोर दोन वेळा आंदोलने केली. फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला बँकेतील अधिकारीच पाठीशी घालत असल्याचा आरोप फसवणूक झालेल्या ग्राहकांनी केला होता. शहर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर संबंधीत संशयित कर्मचाऱ्याने ग्राहकांची फसवणूक केल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी संशयित तोहिद शरिकमसलतवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. याबाबत फसवणूक झालेल्या ग्राहकांनी पोलिसांत तक्रार देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या