Sangli News : अवकाळीने बळीराजावर संकट; द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ग्रेप सिटी वाइनरीचा मोठा आधार
Sangli News : तासगाव तालुक्यातील सावळजमध्ये ग्रेप सिटी वाइनरी सहकारी संस्था उभारली गेली आहे. ती संस्था अडचणीत सापडलेल्या द्राक्ष शेतकऱ्यांना आधार ठरत आहे.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळजमध्ये ग्रेप सिटी वाइनरी सहकारी संस्था वाईन फॅक्टरी सुरू झाली आहे. या फॅक्टरीमधून अवकाळी पावसाच्या तडाख्यातून किंवा निर्यात न होणाऱ्या द्राक्षांमधून 7 प्रकारच्या वाईन बनवता येतात. त्यामुळे नेहमी अस्मानी संकटाशी लढणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना (grape farmers) हा एक फार मोठा आधार आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर अवकाळीचे संकट (unseasonal rain) पाचवीला पुजले आहे. अशा अवकाळी संकटात द्राक्ष बागा सापडल्या, तर या द्राक्षबागांकडे द्राक्ष व्यापारी पाठ फिरवतात. मग नाईलाजास्तव ही द्राक्ष फेकून द्यावी लागतात आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. हेच संकट ओळखून द्राक्ष शेतीचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तासगाव तालुक्यातील सावळजमध्ये ग्रेप सिटी वाइनरी सहकारी संस्था उभारली गेली आहे. ती संस्था अडचणीत सापडलेल्या द्राक्ष शेतकऱ्यांना आधार ठरत आहे. आज फेकून देण्यापेक्षा द्राक्ष माल जात आहे आणि त्यातून थोडेफार का होइना पैसे देखील मिळत आहेत याचे शेतकऱ्यांना जास्त समाधान वाटते.
व्यापारी न नेणारी द्राक्षे योग्य दरात ग्रेप सिटी वाइनरीकडून खरेदी
द्राक्ष हंगाम काळात पाऊस किंवा खराब वातावरणामुळे हातातोंडाशी आलेली द्राक्षे पावसाच्या तडाख्यात सापडल्याने व्यापारी हा द्राक्ष माल नेण्यास नकार देतात. अशावेळी द्राक्ष शेतकऱ्याला ही द्राक्षे बांधावर फेकून देण्यची वेळ येते. आज ग्रेप सिटी वाइनरीमधून पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या आणि व्यापारी द्राक्षं काही कारणांमुळे न नेणाऱ्या तासगाव तालुक्यासह कवठेमहांकाळ, जत, खानापूर, आटपाडी तालुक्यातील द्राक्ष शेतकऱ्यांसाठी आधार आहे. व्यापारी न नेणारी द्राक्षे योग्य दरात ही ग्रेप सिटी वाइनरी घेते आणि यापासून वाईन बनवते.
ग्रेप सिटी वाइनरीमध्ये बनणारी वाइन 9 राज्यात निर्यात
आज या वाईनरीमध्ये द्राक्षपासून जवळपास 7 प्रकारच्या वाईन बनवल्या जात आहेत. द्राक्षबरोबरच, जांभूळ, करवंद, मँगो, मध यापासून देखील या ग्रेप सिटी वाइनरीमध्ये वाइन बनवली जाते. तसेच डाळींबपासून वाइन बनवण्याचा प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे लवकरच डाळिंबपासून देखील वाइन बनवणे सुरु करण्यात येणार आहे. तसेच तासगाव तालुक्यासह जवळच्या भागातून बनणाऱ्या द्राक्षपासून बनणारी वाईन ही उत्तम दर्जाची असते आणि या वाईनला जास्त मागणी असल्याचे वाईन निर्यात करणारी कंपनी सांगते. आज सावळजमध्ये ग्रेप सिटी वाइनरीमध्ये बनणारी वाइन ही महाराष्ट्रसह 9 राज्यात निर्यात होते. प्रत्येक वाईनचे वेगवेगळे वैशिष्ट्य असून यात Hamster मँगो फ्लेवर असलेली आणि खासकरून लेडीजसाठी प्रसिद्ध असलेली देखील वाइन प्रसिद्ध आहे. त्यामुळे नेहमी अस्मानी संकटाशी लढणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांला अशा वाइन मोठा आधार ठरत आहेत.
दुसरीकडे, एप्रिल संपत आला तरी अजून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्षे निर्यात झाली नाहीत. द्राक्ष व्यापाऱ्यांनी आता नेली तर ती कवडीमोल दराने नेतील. आशा वेळी या वाईन फॅक्टरी शेतकऱ्यांना आधार बनत आहेत. शेतमालावर किंवा फळावरती प्रक्रिया करणारे उद्योग वाढण्याची गरज आहे तरच शेतकरी या अस्मानी संकटकाळात तरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या