(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : थकीत पगारासाठी सव्वा दोन महिन्यांपासून विटामध्ये तहसील कार्यालयासमोर आंदोलन, यशवंत कारखान्यातील कामगाराचा मृत्यू
Sangli News : थकीत पगाराच्या मागणीसाठी गेल्या सव्वा दोन महिन्यापासून सांगली जिल्ह्यातील विटा तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेल्या यशवंत साखर कारखान्याच्या आंदोलनातील अत्यवस्थ अमृत यशवंत लोंढे या कामगाराची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली.
Sangli News : थकीत पगाराच्या मागणीसाठी गेल्या सव्वा दोन महिन्यापासून सांगली (Sangli) जिल्ह्यातील विटा (Vita) तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेल्या नागेवाडी येथील यशवंत साखर कारखान्याच्या आंदोलनातील अत्यवस्थ झालेले अमृत यशवंत लोंढे (वय 65, रा. वाळूज, ता. खानापूर) या कामगाराची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. विटा येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
1 फेब्रुवारीपासून आंदोलन
विटा तहसील कार्यालया समोर 1 फेब्रुवारीपासून थकीत पगाराची आठ कोटी 28 लाख रुपयेची रक्कम कामगारांना मिळावी, यासाठी कामगारांचे आंदोलन सुरु आहे. हे कामगार गेल्या तब्बल सव्वा दोन महिन्यापासून आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनातील कामगारांपैकी अमृत लोंढे या कामगाराची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर विटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. उपचार सुरू असताना रविवारी (16 एप्रिल) सायंकाळी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला
एक हजारांहून अधिक साखर कामगारांचे 8 कोटी 28 लाख कोटींचं देणे
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी सन 2012 मध्ये कारखान्याचा लिलाव केला आणि आपले कर्ज फेडून घेतले. त्यावेळी या लिलावातून मिळालेल्या पैशातून एक हजाराहून अधिक साखर कामगारांचे एकूण 8 कोटी 28 लाख रुपये जिल्हा बँकेकडून देणे आहे.
गुरुवारी तब्येत खालावली, रविवारी रुग्णालयात अखेरचा श्वास
वाळूज (ता. खानापूर) येथील कामगार अमृत लोंढे यांना गुरुवारी (13 एप्रिल) अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या सहकारी आंदोलन कामगारांनी त्यांना त्यांच्या विट्यातील मुलाच्या घरी पाठवले. मात्र त्यांना शुक्रवारी (14 एप्रलि) पहाटे पुन्हा त्रास वाढल्याने येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. उपचार सुरु असताना रविवारी (16 एप्रिल) सायंकाळी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने कुटुंबीयासह आंदोलनास बसलेल्या यशवंत कारखान्याच्या कामगारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.