Sangli News : वाघाचा 'छावा' ते आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत; तासगाव तालुक्यात आबा-काकानंतर आता दोन ज्युनिअर पाटलांची खणाखणी सुरू
तासगाव (Tasgaon) तालुका आतापर्यंत स्वर्गीय आर. आर. पाटील आबा आणि संजय पाटील यांच्या राजकीय संघर्षाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जात होता. आबा आणि संजयकाका पाटील यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच तालुक्यातील राजकीय संघर्षाने झाली होती.
![Sangli News : वाघाचा 'छावा' ते आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत; तासगाव तालुक्यात आबा-काकानंतर आता दोन ज्युनिअर पाटलांची खणाखणी सुरू political tussle between rohit r r patil and mp sanjay patil son prabhakar patil in tasgaon politics sangli news Sangli News : वाघाचा 'छावा' ते आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत; तासगाव तालुक्यात आबा-काकानंतर आता दोन ज्युनिअर पाटलांची खणाखणी सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/cf3cbea39f664ab99780cc4d6e3b0c6f1674374378489444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sangli News : सांगली जिल्ह्यातील तासगाव (Tasgaon) तालुका आतापर्यंत स्वर्गीय आर. आर. पाटील आबा आणि संजय पाटील यांच्या राजकीय संघर्षाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जात होता. आबा आणि संजयकाका पाटील यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच तालुक्यातील राजकीय संघर्षाने झाली होती. आबा गृहमंत्री पदावर असतानाही संजय पाटील यांनी नमती भूमिका न घेता विरोध कायम ठेवला होता. या विरोधाला राष्ट्रवादीमधीलच काही नेते संजय पाटील यांना रसद पुरवत होते.
आबा यांच्या निधनानंतर काही वर्षांमध्ये आबांचे कुटुंब आणि संजय पाटील गटात कधी वाद, तर कधी दोघांमध्ये सामंजस्य होऊन वाद टाळले जायचे. मागील काही निवडणुकीत दोन्ही गटाने वाद टाळले. मात्र, आपल्या मुलाला राजकारणात आणणार नाही, असे काही वर्षांपूर्वी खासगीत म्हणणाऱ्या खासदार संजय पाटील यांना मात्र अलीकडेच आपला मुलगा प्रभाकरला राजकारणात लॉन्च केलं आहे. त्यामुळे दोन सिनिअर पाटलांमधील संघर्ष आता ज्युनिअर पाटलांपर्यंत येऊन पोहोचला आहे. प्रभाकर पाटील यांनी सूचक इशारा दिल्यानंतर रोहित आर. आर. पाटील यांनीही आता जाहीर इशारा दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे. दोन्हीकडून भावी आमदार म्हणून केला जात असल्याने आव्हानाची भाषा वाढतच जाण्याची चिन्हे आहेत. रोहित पाटलांना आगामी निवडणूकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित समजली जात आहे.
वाढदिवसानिमित्त पोस्टरबाजी
प्रभाकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी पोस्टरवर भावी आमदार प्रभाकर पाटील यांना शुभेच्छा म्हणत राजकीय एन्ट्रीस शुभेच्छा दिल्या. मात्र, तेव्हापासूनच राष्ट्रवादीकडून आधीच भावी आमदार म्हणून संबोधले जात असलेल्या रोहित पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्यात आता राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वडिलांपाठोपाठ रोहित आणि प्रभाकर यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही तालुक्यातीलच गटातील विरोधाने होणार असे दिसत आहे.
दोघांकडून संपर्क वाढवण्यास सुरुवात
रोहित पाटील यांच्यानंतर आता प्रभाकर पाटील यांनीही तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात संपर्क वाढवायला सुरुवात केलीय. काही दिवसांपूर्वी नागज येथे एका कार्यक्रमात प्रभाकर पाटील यांनी आपल्या भाषणात आक्रमकपणा आणत मला विरोधकांना सांगायच आहे, संजय पाटील नावाच्या वाघाचा मी छावा आहे. एकदा मनावर जर आम्ही घेतलं, तर गुंडगिरी करणारे घरातूनसुद्धा बाहेर पडणार नाहीत असा विरोधकांना म्हणजे रोहित पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला होता. या इशाऱ्याचा धागा पकडत इशारा दिला.
आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत
शुक्रवारी मनेराजुरी येथे झालेल्या कार्यक्रमात रोहित पाटील यांनी आम्हाला कोणी घराबाहेर पडू देणार नाही, असे म्हणत असेल, तर आम्ही देखील बांगड्या भरल्या नाहीत. आबांच्या कार्यकर्त्यांना हात लावाल, तर गाठ माझ्याशी आहे, असे म्हणत प्रभाकर पाटील यांना प्रतिआव्हान दिले.
आम्हाला कोणी घराबाहेर पडू देणार नाही, असे म्हणत असेल, तर ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी पण असतात असे म्हणत आम्ही देखील बांगड्या भरल्या नाहीत. आबांच्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर गाठ माझ्याशी आहे, असे म्हणत प्रभाकर पाटील यांना रोहित पाटील यांनी प्रतिआव्हान दिले. आपण तालुक्यासाठी किती योगदान दिले याचा विचार करा, नाही, तर पुण्या, मुंबईला जाऊन राहण्याची आपल्यावर वेळ येणार आहे असे म्हणत रोहित पाटील यांनी प्रभाकर पाटील यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादीकडून रोहित पाटील यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रोहित पाटील यांचा उल्लेख भावी आमदार असाच केला जात आहे. दुसरीकडे, अलीकडील काळात खासदार समर्थकांकडून प्रभाकर पाटील यांचा देखील उल्लेख भावी आमदार असाच केला जात आहे. विधानसभा निवडणुकीला अद्याप कालावधी असला तरी, या दोन्ही भावी आमदारांनी भाषणातून शाब्दिक जुगलबंदी करून मतदारसंघात राजकीय वातावरण तापवले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या जुगलबंदीने राजकीय संघर्षाची नांदी दिसून येत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)