दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
एकनाथ शिंदे यांचं मुंबई महानगरपालिकेचे बजेट हे दहा हजार कोटी आहे. प्रत्येक उमेदवाराला ते दहा कोटी रुपये देणार, तो सर्व पैसा लुटला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Sanjay Raut on BJP: ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडवणीस करतील असं मला वाटत नाही, धनंजय मुंडे यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करण हे फडणवीसांना सोपं नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दोन मंत्री फडवणीस मंत्रिमंडळातील भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून जात आहेत हा या सरकारला लागलेला काळीमा असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला. राऊत यांनी सांगितले की, आतापर्यंत हे सरकार आल्यापासून 1500 च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. किडनी विकण्याचे प्रकरण समोर समोर, पण अशी असंख्य प्रकरण आहेत. लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना. त्यांच्या राज्यामध्ये प्रजा जनता किडनी विकून जगण्याचा प्रयत्न करते. एकनाथ शिंदे यांचं मुंबई महानगरपालिकेचे बजेट हे दहा हजार कोटी आहे. प्रत्येक उमेदवाराला ते दहा कोटी रुपये देणार, तो सर्व पैसा लुटला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भ्रष्टाचाऱ्यांसाठी पूर्ण संरक्षण मिळेल
संजय राऊत म्हणाले की, आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहतो हा संदेश भाजपने दिला आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी, जे भ्रष्ट आमदार खासदार नेते आहेत त्यांनी आमच्या पक्षात यावं तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळेल हा तो संदेश आहे. देवेंद्र फडवणीस टप्प्याटप्प्याने गेम करतील आणि शेवटचा घाव ते मिंद्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री, असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदेचा पक्ष पूर्णपणे गिळणार आहे आता नाही तर उद्या. विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अस्तित्वात असेल की नाही याच्याविषयी माझ्या मनात पहिल्यापासून शंका आहे.
ड्रग्सचे कारखाने म्हणजे गुंतवणूक आहे का?
राऊत म्हणाले की, विद्यार्थी, कॉलेज, शाळेत ड्रग्स पूर्वी बाहेरून येत होतं. आता महाराष्ट्रामध्ये कारखाने उघडले जात आहेत. फडणवीस सांगतात की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येणार आहे, गुंतवणूक येणार आहे, मग हे ड्रग्सचे कारखाने म्हणजे गुंतवणूक आहे का? असा सवाल त्यांनी केला. ड्रग्स रॅकेट आता सत्ताधारांच्या घरापर्यंत पोहोचला असेल आणि तिथून ही सगळी यंत्रणा राबवली जात असेल तर या महाराष्ट्रात काय राहील? असे ते म्हणाले. ड्रग्स प्रकरणात उपमुख्यमंत्र्याच्या भावाचं नाव आलं आहे. साताऱ्यात मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सातारच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. ताबडतोप याची चौकशी करण्यासाठी एक हाय लेवल एसआयटी स्थापन केली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.
राऊत यांनी अजित पवार यांच्यावरही तोफ डागली. अजित पवार काही झालं तरी अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील ही त्यांची व्यक्तिगत मजबूरी आहे त्यांच्या कुटुंबाची मजबूरी आहे. ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी गेले असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























