मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
Supriya Sule on Dhananjay Munde: देशमुखांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर कोणाला फोन झाले? हे सर्व समोर असताना त्यांची भेट कशी काय झाली असा प्रश्न सुद्धा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

Supriya Sule on Dhananjay Munde: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यामध्ये धनु भाऊंच्या कमबॅक होण्याची चर्चा रंगली. माणिकराव कोकाटे यांची विकेट पडताच धनु भाऊ एन्ट्री करणार का? असा प्रश्न चर्चिला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कमबॅकला कडाडून विरोध केला आहे.
अमित शाहांनी त्यांना भेट कशी दिली?
अमित शाहांनी त्यांना भेट कशी दिली? असा प्रश्न सुद्धा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. संतोष देशमुख खून प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती? देशमुखांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर कोणाला फोन झाले? हे सर्व समोर असताना त्यांची भेट कशी काय झाली असा प्रश्न सुद्धा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. महादेव मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे आणि संतोष भाऊंनाही न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तुमच्याच पक्षाचा काम करु शकत नाही?
धनंजय मुंडे यांची भेट विकासाच्या मुद्द्यावर असल्याचे सांगितलं जात आहे त्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला. जर सत्ताधारी आमदारांचीच काम होत नसतील तर हा मोठा प्रॉब्लेमच असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, गृह खातं आणि सहकार खाते अमित शाहांकडे आहे. महाराष्ट्रामध्ये सहकार खाते हे त्यांच्याच पक्षाकडे आहे, मग असं कोणतं काम होते की ते तुमच्याच पक्षाचा मंत्री करू शकत नाही? अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली.
राजीनामा तुमच्याच सरकारने घेतला
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला थोडं वाईट वाटलं. ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झाले हे मी मान्य करते, पण त्यांचा राजीनामा घेतला. काल संतोष भाऊंची सगळी फॅमिली अस्वस्थ होती. काल मी देशमुख कुटुंबांशीही बोलले, मी मुंडे कुटुंबांशीही बोलले. या पार्श्वभूमीवर मला खरंतर आश्चर्य वाटलं की अमित भाईंनीही त्यांना भेट कशी दिली काय कारण झालं माहिती नाही. त्या म्हणाल्या की, संतोष भाऊंच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्याच सरकारने घेतला. अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य आहे? मला वाईट वाटलं की अरे असं कसं झालं? अस त्या म्हणाल्या. मुंडे यांनी विकासासाठी भेटल्याचे सांगितल्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, मला आश्चर्य वाटते की या देशाच्या होम मिनिस्टरकडे कोणत्या विकासाचं काम असेल. महाराष्ट्रात एका सत्तेत असलेल्या आमदाराची कामं होत नसतील आणि सत्तेत असलेल्या आमदारांना दिल्लीला काम करायला येत असेल तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ना? असा टोला त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या























