Sangli News : सांगलीत भर निवडणुकीत गावच्या ओढ्याला आला पैशांचा पूर, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अनेकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे सापडले. या ठिकाणी पैसे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. यामध्ये महिलांचा देखील समावेश होता.
सांगली : गावचा ओढा म्हटलं की, त्याला पावसाळ्यात पूर येत असतोच. परंतु सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या गाव ओढ्याला पैशाचा पुर आला. त्यामुळे पैसे गोळा करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र ओढ्याच्या पात्रात दिसून आले. याठिकाणी अनेकांना पैसे सापडले परंतु, काहीजण मात्र पोलिसांचे झंझट मागे लागू नये म्हणून फक्त बघ्यांची भूमिका घेत होते.
पैसे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी येथून मुख्य ओढा व तलावाच्या सांडव्यावरून दुसरा ओढा वाहत आहे. हे दोन्ही ओढे आटपाडी बाजार पटांगण येथे एकत्र येतात. अंबाबाई मंदिराकडून वाहत येणाऱ्या ओढ्याला 500 रुपयांच्या नोटा वाहत येत असल्याचे दिसले. त्यानंतर ही बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. या ठिकाणी नागरिकांनी पैसे गोळा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अनेकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे सापडले. या ठिकाणी पैसे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. यामध्ये महिलांचा देखील समावेश होता. परंतु पैसे या ठिकाणी कसे वाहत आले? आटपाडीच्या आठवडी बाजारात आलेल्या एखाद्या व्यक्तीचे पडले होते का? की चोरी लपविण्यासाठी एखद्याने पैसे टाकून दिले, याचे गौडबंगाल मात्र अद्याप कायम आहे.
इतर महत्वाच्या बातम्या