रोहित पाटलांविरोधात संजयकाकांचा मुलगा रिंगणात उतरणार, प्रभाकर पाटील अजितदादांच्या भेटीला, तासगावमध्ये काँटे की टक्कर?
माजी खासदार संजय पाटील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यामुळे लवकरच मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार आहे.
सांगली: तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पेच अद्याप सुटला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विरोधात मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याने त्यांना 'घड्याळ' हातात बांधावे लागणार असल्याची चर्चा आहे. यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे रोहित पाटील व प्रभाकर पाटील अशी दुरंगी लढतीची शक्यता आहे.
प्रभाकर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे प्रभाकर पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित आहे. मात्र, महायुतीत हा मतदारसंघ भाजपशिवाय ज्या मित्रपक्षाच्या वाट्याला जाईल. त्या पक्षात प्रभाकर पाटील यांना प्रवेश करावा लागणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे प्रभाकर पाटील लवकरच घड्याळ हातात बांधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माजी खासदार संजय पाटील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यामुळे लवकरच मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार आहे.
दोन सिनिअर पाटलांमधील संघर्ष आता ज्युनिअर पाटलांपर्यंत
आबा यांच्या निधनानंतर काही वर्षांमध्ये आबांचे कुटुंब आणि संजय पाटील गटात कधी वाद, तर कधी दोघांमध्ये सामंजस्य होऊन वाद टाळले जायचे. मागील काही निवडणुकीत दोन्ही गटाने वाद टाळले. मात्र, आपल्या मुलाला राजकारणात आणणार नाही, असे काही वर्षांपूर्वी खासगीत म्हणणाऱ्या खासदार संजय पाटील यांना मात्र अलीकडेच आपला मुलगा प्रभाकरला राजकारणात लॉन्च केलं आहे. त्यामुळे दोन सिनिअर पाटलांमधील संघर्ष आता ज्युनिअर पाटलांपर्यंत येऊन पोहोचला आहे
अजित पवार तासगावबाबत काय निर्णय घेणार?
सांगली जिल्ह्यातील तासगाव विधानसभा मतदारसंघातील माजी खासदार संजय पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्यातील संघर्ष आता पुढच्या पिढीत देखील पहायला मिळणार आहे . एकीकडे आर आर पाटील यांचा मुलगा रोहीत पाटील हा तासगाव मधुन विधानसभा निवडणूक लढवण्याची चिन्हं असताना दुसरीकडे संजय पाटील हे अजित पवारांच्या पक्षाकडून त्यांचा मुलगा प्रभाकरला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते आज मुंबईत अजित पवारांची भेट घेतली. भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या संजय पाटलांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी दोनवेळा शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र शरद पवारांच्या पक्षाकडून तासगाव मधून रोहित पाटील यांचं नाव नक्की समजलं जातं असल्याने आता संजय पाटील त्यांच्या मुलाला अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायंत. अजित पवार आणि दिवंगत आर आर पाटील यांचे संबंध सर्वश्रुत होते. त्यामुळे आता अजित पवार तासगावबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे.
माजी खासदार संजय काका पाटील म्हणाले, तासगाव कवठेमहाकाळ हा विधानसभा मतदारसंघापूर्वी राष्ट्रवादीकडे होता. अजून सुद्धा त्यांची जागा निश्चित व्हायची आहे त्या संबंधात भेट घेतली. अजित पवार यांच्या भेटीनंतर मी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. तो मतदार संघ त्यांच्याकडे राहणार असेल तर काय या उद्देशाने आजची भेट झाली. उद्या संध्याकाळपर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील कोण लढणार कोणी उभं राहायचं ही तालुक्यातली गणित समीकरणे पाहून आम्ही पुढचे पाऊल उचलत आहोत. ही जागा राष्ट्रवादीकडेच आहे का या सगळ्या संदर्भात आम्ही दादांशी चर्चा केली आहे . भाजपची आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी या सगळ्या संदर्भात चर्चा केली आहे . साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेतली आहे त्यांना सुद्धा भेटणार आहे. मतदार संघ कोणाला हे ठरल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल . वाद एवढाच आहे की काही पातळी सोडून राजकारणात बोलण्याची भूमिका सुरू झाली म्हणून जशास तसे बोललो
हे ही वाचा :