APMC Election: आमदार गोपीचंद पडळकरांची ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; आटपाडीत बाजार समिती मतदान केंद्रावरील प्रकार
APMC Election: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली असल्याची घटना घडली आहे.
Maharashtra APMC Election: आटपाडीत बाजार समितीच्या मतदान केंद्रावर वादावादीचा आणि मारहाणीचा प्रकार घडला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) आणि विरोधी गटातील एका ग्रामपंचायत सदस्यामध्ये ही वादावादी झाली. या प्रकारानंतर वातावरण तणावपूर्ण बनल्यावर पोलिसांनी (Sangli Police) तत्काळ घटनास्थळी दाखल होत, शांततेचे आवाहन केले.
मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाले. तत्पूर्वी 11 वाजण्याच्या सुमारास दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. या प्रकारानंतर वातावरण तणावपूर्ण झाले. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत शांततेचे आवाहन केले.
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती (Atapadi APMC Election ) निवडणुकीच्या मतदानावेळी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व काळेवाडी गावातील एका सदस्यांमध्ये वादावादी झाली. या वादावादीत आमदार पडळकर यांनी काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यास मारहाण करण्याचा प्रकार घडला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी गटातील काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांच्या कानशिलात वाजवली. त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा
सांगलीच्या तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाचा धुव्वा उडाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपली सत्ता पुन्हा एकदा राखली आहे. 18 पैकी तब्बल 14 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजय झाले आहेत. भाजपाला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुमनताई पाटील आणि रोहित आर आर पाटील यांनी तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड कायम राखला आहे. तब्बल 14 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार झालेले आहेत. या ठिकाणी भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांच्या गटाला केवळ 4 जागा मिळाल्या आहेत. अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची ही निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर काँग्रेसचा एक गट, शेतकरी कामगार पक्ष अशी आघाडी होती. या आघाडी विरोधात भाजपा, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचा एक गट अशी आघाडी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली होती. अटीतटीच्या लढतीमध्ये 14 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपा आघाडीला 4 जागांवर समाधान मानावा लागले आहे. त्यामुळे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर आर.आर.पाटील गटाने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे.