(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
खासदार संजय पाटील यांनी आधी आपल्या स्वीय सहायकाला मारहाण केली असल्याचे सांगितले. याचा जाब विचारायला गेले असताना आपल्या कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण केल्याचे संजयकाकांनी मान्य केले.
सांगली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तसेच कवठेमहांकाळमध्ये नगरपंचायतच्या नगराध्यक्ष बदलाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी घरात घुसून माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याची तक्रार आहे. खासदार संजय पाटील यांनी आधी आपल्या स्वीय सहायकाला मारहाण केली असल्याचे सांगितले. याचा जाब विचारायला गेले असताना आपल्या कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण केल्याचे संजयकाकांनी मान्य केले. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला.
76 वर्षीय आईलाही स्वत: माजी खासदारांनी ढकलून दिले
कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष मुल्ला यांना माजी खासदार पाटील व त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केली असा आरोप केला आहे. यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षीय आईलाही स्वत: खासदारांनी ढकलून दिले असा आरोप राष्ट्रवादी गटाकडून करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली.
थेट घरात घुसून मुल्ला यांना मारहाण
सकाळी साडेसातच्या सुमारास अय्याज मुल्ला हे फेरफटका मारून घरासमोर बसले होते. यावेळी संजयकाका पाटील यांचे पीए खंडू होवळे मुल्ला यांच्या घरी आले. संजय काका भेटायला येणार असल्याचे सांगितले. यावेळी मुल्ला यांनी घरी चहा करायला सांगितला. तोपर्यंत दारात दोन-तीन गाडी येऊन थांबल्या. गाड्यांमधून माजी खासदार पाटील यांच्यासह दहा-पंधरा जण उतरले. त्यांनी थेट घरात घुसून मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांना वाचवायला आलेले त्यांच्या घरातील महिला व मुलांनाही शिवीगाळ करत जबर मारहाण केली.
अरेरावीची व ताणून मारण्याची भाषा, संजय पाटलांचा आरोप
दरम्यान माजी खासदार पाटील यांनी सांगितले, गुरूवारी रात्री माझे स्वीय सहायक खंडू होवाळे यांना नगरपालिकेच्या निवडणुकीवरून मुल्ला, बाळासाहेब पाटील व पिंटू कोळेकर तिघांनी मारहाण केली. याबाबत आज मला माहिती मिळाली. याची विचारणा करण्यासाठी सकाळी गेलो असता अरेरावीची व ताणून मारण्याची भाषा वापरली. यावेळी माझ्या एका कार्यकर्त्यांने दोन थोबाडीत मारल्या. आम्हीही या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारावरून कवठेमहांकाळमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलीस बंबोबस्त वाढविण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या