Jayant Patil on Eknath Shinde : ...तर एकनाथ शिंदेंना नेतृत्व देऊन भाजपने त्यांच्या पक्षाला अधिक जागा द्याव्यात; जयंत पाटलांचा टोला
मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना अधिक पसंती असेल, तर त्यांच्या पक्षाने 70, 80, 90 जागा मागितल्या आहेत त्यांना तेवढ्या द्याव्या, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.
Jayant Patil on Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना अधिक पसंती असेल, तर भाजपने त्यांचे ऐकावे आणि शिंदेंना भाजपने पूर्ण नेतृत्व द्यावं आणि त्यांच्या पक्षाने 70, 80, 90 जागा मागितल्या आहेत त्यांना तेवढ्या द्याव्यात, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला. शिंदे आणि फडणवीस सरकारकडून एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याची जाहिराती आज सगळीकडेच झळकल्या आहेत. यावरुन जयंत पाटील यांनी हा टोला लागावला. ते सांगलीमध्ये बोलत होते. शिंदे यांनी दिलेल्या जाहिरातीनंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील धुसफूस समोर आल्याची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा (13 जून) कोल्हापूर दौरा अचानक रद्द केला आहे.
'विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे दंगली घडवल्या जात आहेत'
दरम्यान, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे, राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत, ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे तिथे दंगली घडवल्या जात आहेत, असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला. सांगलीत जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची भेट घेत कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याबाबत निवेदन सादर केले.
कोल्हापूर, नाशिक, नगर अशा ठिकाणी हे होत असताना हा पॅटर्न वापरला जात असल्याची शंका येते, कोल्हापूरसारख्या शहरात शाहूंच्या पुरोगामी विचारांची बांधणी अतिशय घट्ट आहे, अशा ठिकाणी दंगल होते हे शंकास्पद आहे. गृहमंत्री यांनी एखादी बैठक बोलवावी, आम्ही विरोधी पक्ष म्हणून हवे ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, सोशल मीडियाच्या फेक अकाऊंटबाबत गांभीर्याने विचार करावा, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे, सर्व जाती धर्माना सोबत घेऊन जाणारे राज्य आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
ब्रिटीश आणि मुघलांच्या काळातही वारकऱ्यांवर लाठी हल्ला नाही
गेल्या तीनशे वर्षात ब्रिटीश आणि मघुलाच्या काळातही वारीवर हल्ला झाला नाही. मात्र, या सरकारच्या काळात वारकऱ्यांवर हल्ला झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ज्यांच्यावर लाठी उगारली पाहिजे ते राहिले बाजूला आणि वारकऱ्यांवर लाठी उगारली जाते, असा आरोपही त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या