Samruddhi Mahamarg : खुशखबर! समृद्धी महामार्गाचं काम पूर्णत्वास; अवघ्या काही दिवसांची प्रतीक्षा अन् नागपूर-मुंबई प्रवास सुसाट
Samruddhi Mahamarg : युती सरकारचा आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचं काम पूर्णत्वास आले असून लवकरच हा महामार्ग खुला होणार आहे.
Samruddhi Mahamarg : युती सरकारचा आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 701 किलोमीटर लांब हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या नागपूरपासून इगतपुरीपर्यंतचा (625 किलोमीटर)महामार्ग कार्यान्वित आहे. अशातच आता समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते मुंबईदरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पाही आता पूर्ण झाला आहे. तर आगामी फेब्रुवारी पर्यंत या अंतिम टप्प्यांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. या महामार्गाच्या पूर्णत्वामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर आता 16 तासांऐवजी केवळ 8 तासांत कापता येणार आहे. हा प्रकल्प पंतप्रधान मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो, जो महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी गेम चेंजर ठरणार आहे.
यात खास बाब म्हणजे, फडणवीस यांनी आपल्या या ड्रीम प्रोजेक्टसाठी "सर्वोत्कृष्ट अभियंता पुरस्कार" आणि "राष्ट्रीय गौरव पुरस्कार" मिळालेल्या अत्यंत गुणी सिव्हिल इंजिनियरची निवड केली आहे. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड: ड्रीम प्रोजेक्टचे शिल्पकार ठरले आहे. तर डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड, जे सध्या महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSRDC) चे व्यवस्थापकीय संचालक आहेत, त्यांच्यावर या प्रकल्पाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. डॉ. गायकवाड वेळेत मोठमोठ्या प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी ओळखले जातात. डॉ. गायकवाड यांनी MSRDCचे मुख्य अभियंता म्हणून समृद्धी महामार्गाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कामाची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांना MSRDC चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद बहाल करण्यात आले.
समृद्धी महामार्गाच्या काही वैशिष्ट्ये
हा 6 लेनचा, 120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांब महामार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेसवे आहे, जो 150 किमी प्रतितास गतीने प्रवासासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास आहेत.
इगतपुरी ते मुंबईदरम्यान कसारा जवळ 8 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे, जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमने सुसज्ज आहे.
पर्यावरण आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान
वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी 80 हून अधिक संरचना उभारण्यात आल्या आहेत. महामार्गाजवळ 18 नवीन स्मार्ट टाऊन्स उभारले जाणार आहेत, जिथे स्थानिक वैशिष्ट्यांवर आधारित उद्योगांची स्थापना केली जाईल.
67,000 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या महामार्गामुळे राज्यातील 10 जिल्ह्यांना थेट आणि 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्ष कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. यामुळे प्रचंड सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.
महामार्गाच्या लाभांमुळे केंद्र आणि राज्य सरकारचा खास प्रकल्प
या महामार्गाच्या उभारणीमुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे, तसेच औद्योगिक मालवाहतुकीचा खर्च कमी होईल. मागील दोन वर्षांत या महामार्गावर 1.52 कोटी वाहनांनी प्रवास केला असून 1,100 कोटी रुपये टोलमधून जमा झाले आहेत.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी हा प्रकल्प विशेष महत्त्वाचा आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यातील जनतेला याचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
इतर महत्वाच्या बातम्या