Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाची द्वितीय वर्षपूर्ती! 8 कोटीहून अधिक प्रवाशांचा प्रवास, 1102 कोटींचा महसूल, तर 'इतके' अपघात
Maharashtra Samruddhi Mahamarg: उपराजधानी नागपूर ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या 701 किमीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सर्वसामन्यांसाठी खुला होऊन आता दोन वर्ष पूर्ण झालीत.
Maharashtra Samruddhi Mahamarg बुलढाणा : उपराजधानी नागपूर ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या 701 किमीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) सर्वसामन्यांसाठी खुला होऊन आता दोन वर्ष पूर्ण झालीत. बुलढाणा जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग 11 डिसेंबर 2024 ला दुसरा वाढदिवस साजरा झाला आहे. शिवसेनेतील महाबंडानंतर उद्धव सरकार गडगडले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी समृद्धी महामार्ग पूर्ण झाला नसतानाही 11 डिसेंबर रोजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. त्यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ झाला. एकूण 701 किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सध्यासेवेत रुजू झाला आहे. पाहता पहाता याला दोन वर्षे झाले असून समृद्धीने तिसऱ्या वर्षांत पदार्पण केले आहे.
आतापर्यंत 1102 कोटींचा महसूल
समृद्धी महामार्गामुळे शासनाला आतापर्यंत 1102 कोटींचा महसूल ही मिळाला असून जवळपास 8 कोटी प्रवाशांनी यावरून प्रवास केलाय. या महामार्गामुळे नागपूरसह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शहरे , धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे मुंबई जवळ आली आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुकर झालाय. एकंदरीत समृद्धीमुळे विदर्भासह मराठवाडा या भागाचा विकास ही होण्यास सुरुवात झाली आहे.
समृद्धी महामार्गाचे 233 बळी, दोन वर्षांत 140 अपघात
प्रारंभीपासून लहान मोठ्या अपघातासाठी गाजणाऱ्या आणि वादग्रस्त ठरलेल्या या मार्गावर डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2024 दरम्यान 140 वाहन अपघातांची नोंद झाली आहे. यात 233 प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. काही अपघातात बळींची संख्या लक्षणीय ठरली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात झालेल्या खाजगी बस अपघातात तब्बल 25 प्रवासी जळून कोळसा झाले होते. हा भीषण अपघात बुलढाणा जिल्हाच नव्हे राज्याला हादरविणारा ठरला होता. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, मेहकर आणि लोणार या चार तालुक्यातून हा मार्ग जातो. या टप्प्यात मोठ्या संख्येने लहान, मध्यम आणि मोठे अपघात झाले आहे.
महामार्गवरून 1 कोटी 52 लाख वाहनांची वाहतूक
दरम्यान आजवरच्या दोन वर्षांच्या कालावधीत समृद्धी महामार्गावर वाहनांची (वाहतुकीची) देखील समृद्धी राहिली आहे. या कालावधीत समृद्धी महामार्गवरून 1 कोटी 52 लाख वाहनांची वाहतूक झाली आहे. यात 1 कोटी 5 लाख हलकी वाहने, पाच लाखांवर व्यावसायिक हलकी वाहने आणि 42 लाखांवर अवजड वाहनांचा समावेश आहे. एकंदरीत समृद्धी महामार्गाच्या दोन वर्षात कोट्यावधी प्रवाशांना याचा फायदा झाला तर इंधन व वेळ बचत होण्यास मदत झालीय.
हे ही वाचा