समृद्धी महामार्गावरील 'त्या' भीषण अपघाताला दीड वर्षांचा काळ उलटूला! नुसत्या आठवणींनी अंगाचा थरकाप, मात्र पीडित कुटुंबाचा अद्याप संघर्ष
Samruddhi Expressway Accident : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे दीड वर्षापूर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यातील पीडित कुटुंबाचा अद्याप संघर्ष सुरू आहे.

Samruddhi Expressway Bus Accident : नागपूरहून (Nagpur) पुण्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा बुलढाणा (Buldhana Accident) जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे दीड वर्षापूर्वी भीषण अपघात झाला होता. समुद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) इतिहासातला हा कदाचित सर्वात मोठा अपघात ठरला असावा. 1 जुलै 2023 रोजी झालेल्या अपघातात एक खाजगी प्रवासी बस एका छोट्या पूलाला धडकून बसला आग (Samruddhi Expressway Bus Accident) लागली होती व या आगीत झोपेत असलेल्या 25 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळेस या घटनेने संपूर्ण देश हळहळला होता.
दरम्यान, त्यावेळी या घटनेचं गांभीर्य बघता तात्काळ तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदतही जाहीर केली होती. मात्र दीड वर्ष होऊनही मृतकांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नसल्याचा आरोप अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांनी केला आहे.
समृद्धी महामार्गावर नातेवाईकांचे मुक आंदोलन
अशातच, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील 25 मृत प्रवाशांच्या नातेवाईकांनी काल(6 मार्च) सायंकाळी एकत्र येत थेट धडक दिली ती सिंदखेड राजा पोलीस स्थानकात. पोलीस स्थानकाच्या आवारात अपघातग्रस्त बस अद्यापही उभी असल्याने या बसकडे बघून अक्षरशः हे नातेवाईक घायमोकलून रडले...! अद्यापही या प्रवासी बसच्या मालकावर किंवा चालकावर कुठली कारवाई झाली नसल्याने व सरकारने जाहीर केलेली मदतही मिळाली नसल्याने या घटनेतील मृत प्रवाशांचे नातेवाईक वर्धा आणि यवतमाळ येथून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या घटनास्थळी मुक आंदोलन सुरू केल आहे.
पीडित कुटुंबाचा अद्याप संघर्ष सुरू
घटनेतील मृतकांचे नातेवाईक काल(6 मार्च) रात्रीपासूनच हे घटनास्थळी पोहोचले आहेत आणि आज सकाळपासून अपघात स्थळी हे नातेवाईक मूक आंदोलनाला बसले आहेत. जोपर्यंत सरकार या बस चालकावर व मालकावर ठोस कारवाई करत नाही व जाहीर केलेली मदत देत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, अशी भूमिका या नातेवाईकांनी घेतली आहे. त्यामुळे या आंदोलनाची दखल घेत सरकार काही पावले उचलतंय का? आणि पीडित कुटुंबियांना न्याय देतंय का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र या घटनेच्या नुसत्या आठवणींनी अंगाचा थरकाप उडाला असताना मात्र पीडित कुटुंबाचा अद्याप संघर्ष सुरू असल्याने सर्वसामान्यांनी ही हळहळ व्यक्त केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

























