(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : सिगारेटच्या वादातून सेवानिवृत्त जवानाचा गोळीबार, गुन्हा दाखल
दोघांनीही हातातील लोखंडी रॉडने गणेश प्रसाद यांच्या डोक्यावर मारले आणि पत्नीलाही धक्काबुक्की केली. त्यानंतर दोघेही पळून जात असताना गणेशने घरात जाऊन सर्व्हिस रिव्हाल्वर आणून सुरेशवर गोळ्या झाडल्या.
नागपूरः सिगारेट मागण्यासाठी दुकानात आलेल्या दोघांनी मारहाण केल्याने माजी केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाल्या. यामध्ये एक जण जखमी झाल्याची घटना सकाळी सहा वाजता घडली. गोळीबार करणारा जवान आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.
गणेश प्रसाद असे सेवानिवृत्त जवानाचे नाव आहे. तो सिव्हिल लाईन्स येथील अलाहाबाद बँकेत सुरक्षारक्षकाचे काम करतो. तो 2016 साली छत्तीसगड येथून सेवानिवृत्त झाला. त्यानंतर त्याने सुरक्षारक्षक तर त्याची पत्नी चितादेवी घरी छोटे किराणा दुकान चालविते. सुरेश रामभाऊ ठाणेकर (वय 52 रा. जयताळा) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सुरेश ठाणेकर आणि त्याचा मित्र पुरुषोत्तम हिरालाल सोनेकर (रा. जयताळा) हे गणेश प्रसाद यांच्या किराणा दुकानात आले. यावेळी त्यांनी एक सिगारेट मागितली. मात्र, एक सिगारेट मिळत नसून संपूर्ण पाकीट खरेदी करावे लागेल, असे दुकानात असलेल्या चितादेवी यांनी सांगितले. मात्र, यावरुन त्यांनी चितादेवी यांचेशी वाद घातला. त्यानंतर ते दोघेही निघून गेले.
पुन्हा येऊन केला हल्ला
काही वेळातच दोघेही हातात लोखंडी रॉड व विळा घेऊन आले. त्यांनी गणेश प्रसाद यांच्या डोक्यावर रॉड आणि विळ्याने मारले. याशिवाय पत्नी चितादेवी यांनाही धक्काबुक्की केली. त्यानंतर दोघेही पळून जात असताना गणेश प्रसादने घरात जाऊन सर्व्हिस रिव्हाल्वर आणली आणि सुरेश ठाणेकरवर गोळ्या झाडल्या. एक गोळी ठाणेकरच्या खांद्याला लागली. रक्त वाहू लागताच पुरुषोत्तम सोनेकर याने त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले.तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी गणेश प्रसाद आणि चितादेवी यांना लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना याची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. लता मंगेशकर रुग्णालयात जाऊन गणेश प्रसाद आणि चितादेवी यांची माहिती घेतली. सध्या त्यांच्यावरही उपचार सुरु असून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करीत, बंदूक ताब्यात घेतली. याशिवाय सुरेश आणि पुरुषोत्तम यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पुरुषोत्तम याच्यावर आधीच काही गुन्हे असल्याची माहिती आहे.