(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratnagiri News: मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनानंतर मनसे आक्रमक, रत्नागिरीच्या पाली खानूमधलं कंपनीच कार्यालय मनसेनं फोडलं
Mumbai- Goa Highway: हातिवले टोलनाक्यानंतर आता रत्नागिरीच्या पाली खानूमधलं हायवेचं ऑफीस मनसेनं फोडलं आहे.
रत्नागिरी : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेनं (MNS) मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) खड्ड्यांविरोधात रणशिंग फुंकलं. मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरूनन मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधला हातिवले टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. मनसेचे राजापुर तालुका अध्यक्ष पंकज पंगेरकर आणि उपतालूका अध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, रत्नागिरीतील पाली खानू मधील हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं ऑफीस देखील मनसेनं फोडलं. एकूणच, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.
मनसेच्या पनवेलमधील निर्धार मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर सणकून टीका केली. दरम्यान राज ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर रत्नागिरीत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या
कार्यालयाची तोडफोड केली. रत्नागिरी तालुक्यातील हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं. या अगोदर रायगडच्या माणगावमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. माणगावमधील चेतक सन्नी कंपनीचं कार्यालय फोडलंय. त्यामुळे आता टोलवरुन मुंबई-गोवा महामार्गात मनसेचं खळ्ळखट्याक पाहायला मिळणार आहे.
राज ठाकरेंनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
गेल्या 10 वर्षांत मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांमध्ये अडीच हजार नागरिकांचा जीव गेला आहे. आजवरच्या बांधकामावर साडेपंधरा हजार कोटी खर्च झाले आहेत. तरीही मुंबई-गोवा महामार्गाचा प्रकल्प अजूनही अपूर्ण आहे अशी टीका राज ठाकरेंनी पनवेलच्या मेळाव्यात केली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. या मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. या महामार्गावर कुठे आणि किती खड्डे पडलेत याची माहितीही त्यांनी घेतली.
पाहणी, दौरे,आश्वासने मात्र महामार्गाचं काम मात्र जैसे थे
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai goa highway) काम गेली बारा वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत असते. या मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक या रस्त्याच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील पाहायला मिळतं. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा ठसठशीतपणे समोर येतो. मग आंदोलने सुरू होतात, पाहणी दौरे होतात, आश्वासने दिली जातात. न्यायलये सरकारला खडसावतात मग सरकार एक नवी डेडलाईन देतं. गणपती बाप्पा गावाला जातात आणि महामार्गाचं काम मात्र जैसे थेच राहतं. दीड दशक उलटलंय पण यात तसूभरही फरक पडलेला नाही...
हे ही वाचा :