संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना सांभाळावं नाहीतर ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण लावू शकतात, अशी टीका भाजपने नेते रावसाहेब दानवे यांनी केली.
Raosaheb Danve on Sanjay Raut : उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना सांभाळावं नाहीतर ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण लावू शकतात, अशी टीका भाजपने नेते रावसाहेब दानवे यांनी केली. त्यांच्यामुळेच पक्षाची वाताहात झाली असून, त्यांच्यामुळेच युती तुटल्याचे दानवे म्हणाले. दरम्यान, धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याच्या मुद्यावरुन देखील संजय राऊतांवर त्यांनी टीका केली. ते आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत का? राजीनामा मागायला असा सवालही दानवेंनी राऊतांना केला.
विरोधकांकडून पक्षातील कार्यकर्ते थोपवण्यासाठी ईव्हीएमवर दोष
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवरील सर्वच पक्षांनी कधी कधी स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळं वरच्या सूचना जशा येतील तशा सूचना पाळणाऱ्यांपैकी आम्ही असल्याचे दानवे म्हणाले. त्यांनी कर्नाटक आणि हरियाणा जिंकली. लोकसभेमध्ये आमची हार झाली त्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही. आता विरोधकांकडून आपल्या पक्षातील कार्यकर्ते थोपवण्यासाठी ईव्हीएमवर दोष दिला जात असल्याचे दानवे म्हणाले. ..
संतोष देशमुख यांच्या हत्येचं मी समर्थन करत नाही, दोषींवर सरकार कारवाई करेल
संतोष देशमुख यांच्या हत्येचं मी समर्थन करत नाही. जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे काम सरकार करेल असेही दानवे म्हणाले. प्रकरण सीआयडीकडे गेले आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांना पकडून सरकार त्यांना सजा देईल याची मला खात्री असल्याचे दानवे म्हणाले.
बीडच्या मोर्चात जाण्यासाठी आम्ही कोणाला थांबवलं नाही
जो एखाद्या भागातलं प्रतिनिधित्व करतो त्याला आपल्या वेदना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे असंही दानवे म्हणाले. बीडच्या मोर्चात जाण्यासाठी आम्ही कोणाला थांबवलं नाही, सहभाग घेऊ नका म्हणून पक्षाचा काही असा आदेश नसल्याचे दानवे म्हणाले. या देशात काही घटना घडली की काही लोक राजकारण करतात. ही घटना गंभीर आहे या घटनेत दोषी लोकांना योग्य शिक्षा झाली पाहिजे हे आमचं म्हणणं असल्याचे दानवे म्हणाले.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या अधक्ष्यांच्या लवकरच निवडणुका होणार
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या अधक्ष्यांच्या लवकरच निवडणुका होणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. भाजपमध्ये दर तीन वर्षांनी निवडणुका होतात. जानेवारीमध्ये संघटनेच्या निवडणुका होतील असेही दानवे म्हणाले. जालन्यात भाजपच्या वतीनं सदस्य नोंदणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी रावसाहेब दानवे बोलत होते.