Hemant Dhome : 'चांद्रयान 3'ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो"; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेचं संतप्त ट्वीट
Hemant Dhome : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेने संतप्त ट्वीट केलं आहे.
Hemant Dhome : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) सध्या चर्चेत आहे. हेमंत कलाविश्वात अॅक्टिव्ह असण्यासोबत सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होत असतो. आता मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) खड्ड्यांचे फोटो शेअर करत त्याने संतप्त ट्वीट केलं आहे.
हेमंत ढोमेने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे फोटो ट्वीट केले आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"चांद्रयान 3'ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो... आता आपल्या रागाचं रुपांतर स्वत:चीच थट्टा करण्यात होत चाललं आहे... भीषण". हेमंतने खड्ड्यांची तुलना चंद्रावरील खड्ड्यांशी केली आहे. त्याच्या या संतप्त ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो!
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) August 11, 2023
आता आपल्या रागाचं रूपांतर स्वतःचीच थट्टा करण्यात होत चाललं आहे!!
भीषण! pic.twitter.com/FlLJjYL8LR
हेमंतच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनीदेखील कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विद्यमान आमदारांनी एका वर्षात महामार्ग पूर्ण करण्याची शपथ घेतली आहे. राजकारणी प्रवास करतात तेव्हा यांना हे दिसत नाही का? राज्य सरकारला काही फरक पडत नाही, गडकरींचा सत्कार करुया, महाभयंकर आहे हे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग बनला खड्डे मार्ग...
मुंबई-गोवा महामार्ग खड्डे मार्ग बनला आहे. पावसामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ताच गायब झालाय. रस्ता कुठे? खड्डा कुठे? शोधण्याची चालकांवर वेळ आली आहे. खड्डे भरले जातील अशी आश्वासनं आता अनेक वेळा दिली जातात. मात्र या खड्ड्यामुळे कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण असेल? त्यामुळे खड्डे मुक्त रस्ते आम्हाला कधी मिळणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
हेमंत ढोमेबद्दल जाणून घ्या... (Who is Hemant Dhome)
हेमंत ढोमे हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. 'क्षणभर विश्रांती', 'चोरीचा मामला', 'ऑनलाईन बिनलाइन', 'पोस्टर गर्ल अशा अनेक मराठी सिनेमांत त्याने काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'फकाट' सिनेमातही तो झळकला होता. 'झिम्मा','सनी' या सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुराही त्याने सांभाळली आहे. आता त्याच्या 'झिम्मा 2' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. हेमंत 2012 मध्ये अभिनेत्री क्षिती जोगसोबत लग्नबंधनात अडकला आहे. क्षितीदेखील एक उत्कृष्ट अभिनेत्री असून तिचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे.
संबंधित बातम्या