Ratnagiri News : मनाप्रमाणे शिक्षण घेता येत नसल्याची सल, खेडमध्ये अल्पवयीन मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला!
Ratnagiri News : आपल्याला मनाप्रमाणे शिक्षण घेता येत नसल्याने एका अल्पवयीन विद्यार्थ्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच ही घटना आहे.
Ratnagiri News : आपल्याला मनाप्रमाणे शिक्षण घेता येत नसल्याने एका अल्पवयीन विद्यार्थ्याने स्वतःच्याच अपहरणाचा (Kidnap) बनाव रचला. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यात हा प्रकार घडला; खेड पोलिसांनी मुलाचा शोध घेत केवळ एका रात्रीतच या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. बारावीच्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा रस नाही. कारण मला आयटीआयमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. पण घरच्यांना ही गोष्ट सांगू शकत नसल्याने अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली या अल्पवयीन मुलाने दिली. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच ही घटना आहे. पण त्याच वेळेला पालकांना देखील अंतर्मुख करुन विचार करायला ही घटना भाग पाडते.
नेमकं काय घडलं?
खेड पोलीस स्टेशनमध्ये 9 नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीने आपल्या सतरा वर्षांच्या पुतण्याचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान ज्यावेळी मुलाशी संपर्क साधण्यात आला त्यावेळी त्याने "मला चोरांनी पकडून परजिल्ह्यात नेले आहे. कशीबशी मी माझी सुटका केली. आता एका ठिकाणी मी आश्रयाला थांबलो आहे," अशी माहिती या मुलाने त्याच्या काकांना दिली. त्यानंतर या मुलाशी संपर्क तुटला होता. रत्नागिरी पोलिसांनी तातडीने याबाबत पाऊलं उचलली. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. मुलाच्या शोधाला सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेजारच्या जिल्ह्यातच हे पथक दाखल झालं. मुलाचा शोध घेण्यास पोलीस पथकाला देखील यश आलं. एका रात्रीत या मुलाचा शोध लागला होता. ही बाब समाधानाची होती. पण समोर आलेलं कारण मात्र धक्कादायक होतं.
...म्हणून विद्यार्थ्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचना!
पोलिसांनी मुलाची चौकशी केली. त्यावेळी अल्पवयीन मुलाने सांगितलं की, "बारावीच्या शिक्षणात मला रस नव्हता. मला आयटीआयमध्ये शिक्षण घ्यायचं होतं. पण ही बाब मी घरातील कुणाला सांगू शकत नव्हतो. त्यामुळेच मी घर सोडून निघालो आणि अपहरणाचा बनाव रचला. त्यानंतर पोलिसांनी या मुलाचं समुपदेशन करुन त्याला पालकांच्या ताब्यात दिलं.
ज्यावेळी ही घटना समोर आली त्यावेळी मात्र मुलानं सांगितलेलं कारण प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारं असंच आहे.
पालकांना अंतर्मुख करणारी घटना
असं म्हणतात सध्याचे युग हे स्पर्धेचं आहे. तुम्हाला या स्पर्धेत टिकायचं असेल तर शिक्षण देखील तितकंच महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे सध्या अतिशय गंभीरपणे पाहताना दिसून येत आहेत. अगदी एखादा विषय किंवा शाखा निवडताना देखील सर्व बाजूंचा पुरेपूर विचार केला जातो. या साऱ्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांवरती दडपण देखील येत असल्याच्या गोष्टी समोर येत आहेत. त्यातूनच विद्यार्थ्यांकडून असे प्रकार घडतात. त्यामुळे पालकांनीही या गोष्टीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.