Unseasonal Rain : कोकणाला पावसानं झोडपलं! आजही मुसळधार पावसाचा अंदाज; आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता
Rain Updates : अवकाळी पाऊस पडल्याने किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तर आंबा आणि काजु पिकाला आलेला मोहोर गळून पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
Sindhudurg, Ratnagiri Rain News : राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात अवकाळी पाऊस सुरु आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी दिसून येत आहे. सोमवारी कोकणात मुसळधार पाऊस झाला, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सिंधुदुर्गात आजही सर्वत्र पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. ऐन फुलोऱ्यावर आलेली आंबा, काजू पीक धोक्यात आली आहेत. अवकाळी पाऊस पडल्याने किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तर आंबा आणि काजु पिकाला आलेला मोहोर गळून पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
गेल्या 24 तासांपासून पावसाची हजेरी
सिंधुदुर्गात बहुतांश भागात गेल्या 24 तासांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा दिसून येत आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोपडपून काढलं. दोडामार्ग तालुक्यात सोमवारी रात्रीपासून अवकाळी पाऊस सुरू आहे.
आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता
बदलत्या वातावरणाचा आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्री जोरदार पाऊस पाहायला मिळाला. अवकाळी पावसाचा कोकणातल्या आंबा आणि काजू पिकावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही भागांमध्ये जोरदार तर काही भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. पुढील 24 तास कोकणासह राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आज 9 जानेवारीला विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरीत जोरदार पावसाच्या सरी
रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यात मुसळधार पावसाच्या सरी पाहायाला मिळत आहेत. चिपळूण, संगमेश्वर भागांत रिमझिम पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे तालुक्यातील काही गावांतील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. ऐन थंडीच्या वातावरण असताना पावसाच्या सरी कोसळत आहे. वातावरणातील बदलामुळे आंबा, काजू पीकाला याचा फटका बसू शकतो. सकाळी महाबळेश्वर परिसरात एक तास तुरळक पाऊस पाहायला मिळाला. अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. स्ट्रॉबेरीवर काळे डाग आणि रोग पडण्याची दाट शक्यता असल्याने बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
सिंधुदुर्ग जिल्यातील दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर रात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे आंबा, काजूचं पीक धोक्यात आलं आहे. पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.