महायुतीमध्ये पहिली ठिणगी, झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती नाही, शिंदेंच्या आमदाराची मोठी घोषणा
Raigad Politics : राष्ट्रवादीचे खासदार हे महायुतीशी गद्दारी करत असून शिवसेनेला विरोध करणाऱ्यांना पदं देत असल्याचा आरोप या आधी शिंदेंचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला होता.

मुंबई : येत्या दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra ZP Elections) होत असल्याने सर्वच पक्षांनी त्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय. विधानसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता असताना महायुतीमध्ये आता पहिली ठिणगी पडली आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीशी युती करणार नाही अशी मोठी घोषणा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी केली. तसेच खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे ठाकरे गटाला मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्येच दोन गट पडल्याचं चित्र विधानसभेपासूनच आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले, महेंद्र थोरवे यांच्यात विस्तवही जात नाही. या दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याचं दिसून येतंय.
Mahayuti Alliance In Raigad : राष्ट्रवादीशी युती नाही
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे ठाकरेंच्या शिवसेनेला मदत करत असल्याचा आरोप शिंदेंचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती होऊ शकत नाही अशी घोषणाच त्यांनी केली. यावेळी महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
Mahendra Thorve Vs Sunit Tatkare : सुनील तटकरेंनी महायुतीसोबत गद्दारी केली
या आधीही महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "सुनील तटकरे हे महायुतीसोबत नेहमीच गद्दारी करत आहेत हे मी वारंवार सांगत आलो. आता ज्यांनी महायुतीसोबत गद्दारी केली त्यांनाच या सुनील तटकरे यांनी रायगडच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. सुधाकर घारे यांना सुनील तटकरे यांनीच विधानसभेला माझ्यासमोर अपक्ष उभ केलं होतं. त्यावेळी त्यांच्याशी आपला काहीही सबंध नाही अस देखील तटकरेंनी म्हटलं होत. मात्र आता तटकरे यांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला आहे. सुधाकर घारे यांनी त्यावेळी महायुतीसोबत बेइमानी केली, म्हणून सुनील तटकरे यांनी त्यांना जिल्हाध्यक्ष पद देऊन बक्षीस दिलं."
Shivsena Vs NCP Raigad : शिवसेनेला एकाकी पाडण्याचं काम
विधानसभेच्या निवडणुकीत मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात लढलेल्या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनासुद्धा सुनील तटकरे यांनी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षात घेऊन पक्षाची धुरा दिली. यावरून सुनील तटकरे रायगड जिल्ह्यात शिवसेनेला एकाकी पाडण्यासाठी जाणीवपूर्वक अशी कामे करत असल्याचा आरोप देखील आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. त्यामुळे पुढील काळात सुनील तटकरे यांच्या अशा वागण्याचा किंवा अशा कृत्याचा मापदंड घातला जाईल असा इशारा सुद्धा आमदार थोरवे यांनी तटकरे यांना या आधीही दिला आहे.
ही बातमी वाचा:
























