Raigad : सुनील तटकरे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, भरत गोगावले समर्थक आमदारांनी रणशिंग फुंकलं!
Raigad Guardian Minister : यापुढे सुनील तटकरेंची चाल कधीही यशस्वी होणार नाही, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील असा दावा शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे.
रायगड : जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पालकमंत्रिपदावरुन सुरू झालेला वाद आता आणखी विकोपाला गेल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंच्या पालकमंत्रिपदाला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध कायम आहे. शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींनी खासदार सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली आहे. आगामी काळात सुनील तटकरेंना जिल्ह्यात फिरु देणार नाहीत असा इशाराच आमदार महेंद्र दळवींनी दिला आहे. तर लवकरच भरत गोगावलेंना रायगडचे पालकमंत्रिपद मिळणार असल्याचं भाकितही त्यांनी केलं.
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथे स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर प्रवेशद्वार नामकरण सोहळ्याचे उद्घाटन प्रसंगी पुन्हा एकदा शिंदे सेनेच्या आमदारांकडून खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं.
भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होणार
आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, "एकनाथ शिंदेंसमोर आम्ही आमची कैफियत मांडली आहे. भरत गोगावले यांचे पालकमंत्रिपदाच्या रेस मधील नाव गायब होऊन आदिती तटकरे यांचे टाकण्यात आलं. प्रोटोकॉलनुसार पालकमंत्रिपद हे भरत गोगावलेनाच मिळायला हवं होतं. मात्र तटकरे यांनी गोगावले यांचे नाव यादीतून हटवण्यासाठी त्यांची जादू चालवली. यादीतून नाव गायब करणं हा तटकरे यांचा स्वभाव आहे. सुनील तटकरे यांना गोगावले हे मंत्री झाले तर पालकमंत्री निश्चित होणार हे माहीत झाल्यानेच त्यांनी पालकमंत्री पद त्यांच्याकडे खेचून आणलं. मात्र आमच्या आक्रोशानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर स्थगिती आणली. आम्ही आता आशावादी आहोत की येणाऱ्या चार दिवसात भरत गोगावले पालकमंत्री होतील."
तटकरेंचा पूर्व इतिहास सर्वांनाच माहिती
सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, "सुनील तटकरे यांचा पूर्व इतिहास महाराष्ट्राला माहीत आहे. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाचा वापर करून दबाव तंत्र वापरलं. त्यानी प्रोटोकॉलचे पालन केलं नाही. तटकरे जरी पालकमंत्री पद खेचून आणण्यात यशस्वी झाले असले तरी ते येणाऱ्या काही दिवसात अयशस्वी ठरतील. आता कितीही काही झालं तरी येणाऱ्या काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत योग्य निर्णय घेतील."
महेंद्र दळवी म्हणाले की, "भरत गोगावले यांचं नाव यादीतून वगळल्यानंतर रायगडमध्ये मोठा उठाव झाला. हा खरं तर आमचा आणि लोकांचा उद्रेक आहे. गोगावले हे पालकमंत्री पदाचे दावेदार असतानासुद्धा तटकरेंनी आपल्या झोळीतच दान टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आता कधीच असं होणार नाही. कारण सुनील तटकरे यांची झोळी फाटली आहे. आता जे काही दान पडेल ते भरत गोगावले यांच्या झोळीतच पडेल."
तटकरे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही
लोकसभेला आम्ही सगळ्यांनी सुनील तटकरे यांचे प्रामाणिक काम केलं होतं. खरंतर सुनील तटकरे यांच्याबद्दल आमच्या मनात निगेटिव्हिटी होती. परंतु आम्ही त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह होऊन त्यांना निवडून दिलं. परंतु नेहमीप्रमाणे सुनील तटकरे यांनी त्यांची रणनीती तयार करून आम्हाला दगा दिला. सुनील तटकरे यांनी आतापर्यंत लोकांना फसवण्याचाच धंदा केला. आता तटकरे यांच्या विरोधात एकच मोहीम सुरू झालेली आहे ती म्हणजे तटकरे हटाव मोहीम. येणाऱ्या काळात सुनील तटकरे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही.
ही बातमी वाचा: