Mahendra Thorve : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर रायगडमध्ये राजकीय भूकंप होणार? शिंदे गटाचे महेंद्र थोरवे ठाकरे गटाच्या वाटेवर?
Mahendra Thorve : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता रायगडमध्ये राजकीय भूकंप होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

Mahendra Thorve : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा 5 जुलै रोजी एकत्र विजयी मेळावा पार पडला. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू भाऊ एकत्र आल्याने आता राज्यातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता रायगडमध्ये राजकीय भूकंप होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) हे पुन्हा ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कधीही फसवून जाऊ शकतात, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सुधाकर घारे (Sudhakar Ghare) यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
रायगडच्या कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मोठा विस्फोट करत नव्या चर्चेला उधाण आणलंय. आमदार थोरवे हे त्यांच्या मतदार संघात आता आपल्याला एकत्र काम करायचं आहे, असा सूर लावत ते दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत लोटांगण घालत आपल्याला एकत्र काम करायचं आहे, अशी वल्गना करू लागले आहेत. शिवाय त्यासाठी मी तुमच्या पायावर डोक ठेवेन, असं ते एका भाषणात म्हणताना दिसत आहेत. यावरून आमदार थोरवे हे ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा आता सुधाकर घारे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले होते महेंद्र थोरवे?
जेव्हा महायुती सरकार स्थापन झालं, तेव्हा आमदार थोरवे यांनी अनेकवेळा सुनील तटकरे आणि अजित पवार यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला आहे. आता ते चक्क देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याच्या वल्गना करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रमाणे सत्ता असताना राष्ट्रवादीला रायगडमध्ये अदिती तटकरेंच्या रूपात पालकमंत्री पद दिले, तेच काम देवेंद्र फडणवीस आता करत आहेत, अशी टीका करत मी याबाबत नाराज आहे, असे महेंद्र थोरवे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर सुधाकर घारे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आमदार थोरवे हे एकनाथ शिंदे यांना सुद्धा कधीही फसवून जाऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. आता सुधाकर घारे यांच्या दाव्यावर महेंद्र थोरवे नेमकं काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा


















