Eknath Shinde: सीमेवरील शत्रू अमित शाहांमुळे बिळात लपून बसलेत, त्यांचं भाषण ऐकून अंगावर शहारे आले; एकनाथ शिंदेंकडून अमित शाहांची तोंडभरुन स्तुती
Eknath Shinde: अमित शाहांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.

रायगड: आज देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावरती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे. त्यामुळे अमित शाह यांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं. यावेळी रायगडावरती राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार आदी नेते उपस्थित होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. बोलताना शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना तसे फार मोठे आयुष्य मिळाले नाही. आणखी 20 ते 30 वर्षे महाराज असते तर देशाचा इतिहास बदलला असता, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर यावेळी अमित शाहांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.
रायगडाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला...
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, रायगडाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला. तसंच रायगडाने महाराजांचा शेवटचा दिवसही पाहिला. महाराज अवघ्या 50व्या वर्षी वारले. ते आणखी 20 ते 30 वर्षे जगले असते तर आपला सगळा इतिहास बदलून गेला असता असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे तोरण बांधले नसते तर आजही आपण गुलामगिरीमध्ये खितपत पडलो असतो. शिवरायांमुळेच आपले अस्तित्व आहे हे कुणाला विसरता येणार नाही. शिवबाच्या बाबतील आपण काय सांगावे त्यांनी ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा काढला ती वाघ नखे आपण ब्रिटनवरुन आणली आहेत. त्यांचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. शिवरायांनी हाती तलवार घेतली पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ती रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या रणनितीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
अमित शाहांवर कौतुकांचा वर्षाव
अमित शाहांचं कौतुक करताना एकनाथ शिंदे म्हणाले, एकदा ठरलं अमित शाहांनी ठरवलं की ते करतात. 370 हटवले, वक्क्फ बोर्डाच्या विधेयकावेळी केलेलं भाषण अंगावर शहारे आणणारे होते. सीमेवरील शत्रू बिळात बसले आहेत, कारण अमित शाह आणि मोदीजींमुळे, देशामध्ये हिंसा पसरवणारे लोक, दहशतवादी असतील अतिरेकी असतील त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम त्याचबरोबर 26/11 चा मास्टरमाईंड राणाला दिल्लीत मुंबईत आणलं जाईल आणि फासावर चढवलं जाईल. ही कामगारी आपल्या प्रधानमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांची आहे. यावेळी शिंदेंनी एक शेर म्हणत अमित शाहांचं कौतुक केलं आहे.
अमितभाई आपके इरादो से चट्टाने भी डगमगा जाते हैं,
दुश्मन क्या चीज हैं, तुफान भी आपना रूख बदल देता हैं...
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आपल्या आणि मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे जात आहे, देशाचा विकास होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा देखील विकास होतो आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालो आहे, असंही पुढे एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे, त्याचबरोबर आपल्या इतिहासाचे जतन झाले पाहिजे आणि अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे. गडकोट किल्ले आपला इतिहास आहे. त्याचं संवर्धन, जतन झालं पाहिजे यासाठी पुढाकार घेतंला जातो. एएसआयनं देखील सहकार्य केलं पाहिजे हीच अमित शाहांना विनंती आहे, असंही पुढे एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडावर बोलताना म्हणाले, शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला ती हीच जागा आहे. शिवाजी महाराज यांचा जन्म झाला ती ही जागा आहे. शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला ती ही जागा आहे. बालशिवाजीपासून ते छत्रपतीपर्यंतचा इतिहास या पवित्र भूमीत आहे. रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे. सातवीपासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी आले पाहिजे. त्यांनी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असेही शाह यांनी शनिवारी बोलताना म्हटलं आहे.

























