Pune Crime News: अभिनेत्रीने महिला पोलिसाचा आधी शर्ट फाडला नंतर चावा घेतला; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्याच्या वडगावशेरी परिसरात अभिनेत्रीने रस्त्यावर राडा केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अभिनेत्री वडगावशेरी परिसरात नागरिकांना ओरडून शिवीगाळ करत होती.
Pune Crime News: पुण्याच्या वडगावशेरी परिसरात अभिनेत्रीने रस्त्यावर राडा केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अभिनेत्री वडगावशेरी परिसरात नागरिकांना ओरडून शिवीगाळ करत होती. एक महिला पोलीस तिला शांत करण्यासाठी आली असता तिने महिला पोलीसाला मारहाण करून त्याचा शर्ट फाडण्याचा प्रयत्न केला. त्या अभिनेत्रीनं महिला पोलिसांच्या हातावर चावाही घेतला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री वडगावशेरी येथील रामचंद्र सभागृह कार्यालयासमोर घडली.
नेमकं काय घडलं?
आरोपी महिला रामचंद्र सभागृहासमोरील रस्त्यावर आरडाओरड करत होती आणि ये-जा करणाऱ्यांना शिवीगाळ करत होती. महिला कॉन्स्टेबल घटनास्थळी दाखल झाल्या. तिने महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला. महिलेला रस्त्याच्या कडेला घेऊन जात असताना महिलेने स्वत:हून तिचा शर्ट फाडला. त्यानंतर तिने महिला पोलीस कॉन्स्टेबलला हाताने बेदम मारहाण केली. त्यानंतर महिला पोलिसाने 28 वर्षीय अभिनेत्री विरुद्ध चंदन नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. अभिनेत्रीला अद्याप अटक करण्यात आली नाही आहे. चंदन नगर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक मुळूक घडलेल्या प्रकाराचा तपास करत आहे.
शहरात आयटी क्षेत्राम काम करणाऱ्या तरुणींचं प्रमाण फार आहे. रात्री अपरात्री फिरायला जाणे, पार्ट्या करुन धिंगाणा घालणे, असे प्रकार वाढत आहेत. त्याशिवाय पब, लाऊंज या ठिकाणी अनेक तरुणांची गर्दी बघायला मिळते. त्यांच्या दृष्टीने हे मॉडर्न कल्चर समजते जाते. मात्र याच वागण्याचा त्रास अनेक नागरिकांना होत आहे शिवाय याचा त्रास आता पोलिसांना देखील होत आहे. त्यांच्यावर मारहाणीचे अनेक प्रकरणं समोर येत आहे. पुण्यातील चंदन नगरजवळ खराडी आयटी पार्क जवळ आहे. त्यामुळे या परिसरात अनेक आयटीत काम करणारे तरुण-तरुणी राहतात. रात्रीच्यावेळी ते फिरायला बाहेर पडतात. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रकरणं घडत आहेत.
यापुर्वी नवी मुंबईत मद्यधुंद अवस्थेत भर रस्त्यात तमाशा केला होता. मद्यधुंद असलेल्या मुलीने पोलिसांवर हात उगारला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हा प्रकार पुढे आला होता. ओला चालकाने भाडे नाकारले होते. त्यानंतर तरुणीने त्याच्या कारचा ताबा मिळवला आणि रात्री भररस्त्यात धिगाणा घालायला सुरुवात केली होती. शिवाय पोलिसांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यासोबत अश्लिल चाळेसुद्धा केले होते.