Satish Wagh: सतीश वाघ प्रकरणात बायकोच मास्टरमाईंड; पैसे अन् व्यवहारासाठी घरची कारभारीण जीवावर उठली, आधी फक्त हल्ला करण्याची मागणी पण नंतर....
Satish Wagh Murder Case : सतीश वाघ यांच्या पत्नीनेच आरोपींना पाच लाखांची सुपारी देण्याची तयारी दाखवून त्यांचा खून घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे.
पुणे: पुण्यात काही दिवसांपुर्वी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता, त्या खुनाचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आलं आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच आरोपींना पाच लाखांची सुपारी देण्याची तयारी दाखवून त्यांचा खून घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून खून घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहिनी सतीश वाघ (वय 53, रा. फुरसुंगी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. आतिश जाधव, पवन श्यामकुमार शर्मा (वय 30, रा. शांतीनगर, धुळे), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय 32, रा. अनुसया पार्क, वाघोली), अक्षय हरीश जावळकर, विकास शिंदे यापूर्वी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Satish Wagh Murder Case)
सतीश तात्याबा वाघ यांच्याकडे आरोपी अक्षय हरीश जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता. त्या वेळी मोहिनीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. यासंबधीची कुणकुण सतीश वाघ यांना लागल्यामुळे त्यांच्या पत्नीकडूनच खुनाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव आखला. मोहिनी वाघने अक्षयला नवरा सतीश यांचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यापैकी दीड लाख रुपये तिने अक्षयकडे दिले होते. त्यानंतर अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती. त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला आपल्यासोबत सहभागी करून घेतले.अक्षयने आरोपींना दीड लाखाची रक्कम दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
सतीश वाघ हे 9 डिसेंबरला सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकवा गेले असताना पाच जणांनी त्यांचे अपहरण करून अवघ्या 15 मिनिटांमध्ये गाडीतच वाघ यांच्यावर 72 वेळा वार करून त्यांचा निर्घृण खून केला. तासाभरात या सर्व गोष्टी घडल्या त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला. गुन्हे शाखेने त्यांचं अपहरण झालेल्या ठिकाणाहून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना अटक केली.पोलिसांना सतीश वाघ यांच्या पत्नीचा गुन्ह्यात सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले, तिला आता पोलिसांनी अटक केली आहे. (Satish Wagh Murder Case)
आर्थिक व्यवहार अन् पैशांमुळे मोहिनीने केला पतीचा घात
जे आर्थिक व्यवहार सतीश वाघ पाहत होते, ते सर्व आर्थिक व्यवहार मोहिनीला तिच्याकडे हवे होते. सतीश वाघ तिला खर्चासाठी पैसे देखील देत नव्हते. यामुळे सुरुवातीला मोहिनीने अक्षयला पती सतीशला गंभीर जखमी करून ते अंथरुणाला खिळून पडतील असे काहीतरी कर, असे सांगितले होतं. त्याचबरोबर मोहिनीने अक्षयला तू जर असं केलं नाही तर आपल्याबद्दल माझ्या नवऱ्याला सांगेन मग तो तुझे काय हाल करेल हे बघ, अशी धमकी दिल्याची माहिती माहिती आहे. यामुळे अक्षय दबावाखाली होता.
त्यानंतर त्याने कट रचत आरोपींशी संगनमताने सतीश वाघ यांचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर काही वेळातच सतीश यांचा खून करत पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला. आरोपी अक्षयने पोलिस तपासात मोहिनीनेच खुनाची सुपारी दिल्याचे सांगितले होते. पोलिसांनी याप्रकरणी तिची चौकशी करत, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळवली. मोहिनीचा या कटातील सहभाग स्पष्ट होताच (काल) बुधवारी दुपारी पोलिसांनी तिला अटक केली आहे.