Walmik Karad : पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी, एकाच बिल्डिंगमध्ये सहा अलिशान ऑफिस, आता कर्दनकाळ ईडीची एन्ट्री होणार?
Santosh Deshmukh Murder Case : उस तोड कामगारांच्या आयुष्यात काही बदल होत नसताना त्यांचे नेतृत्व करण्याचा दावा करणाऱ्यांनी मात्र कोट्यवधींची माया जमवल्याचं दिसून येतंय.
बीड : परळी आणि बीडममध्ये गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने राज्यातील वेगवगेळ्या शहरांत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होत आहे. त्यातूनच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराड आणि टोळीने 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा करण्यात येतोय . त्यातूनच आता या प्रकरणात ईडीची एंट्री होऊ शकते अशी चर्चा सुरु झाली आहे .
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर काम सुरु असलेल्या असलेल्या एका इमारतीत वाल्मिक कराड, त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्या आहेत.पंचवीस कोटी रुपये मोजून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने या इमारतीत या ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यासाठी बिल्डरसोबत करार केल्याचं समोर आलं आहे.
इमारतीचं काम पूर्ण झालं की त्यांच्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वाल्मिक कराड आणि टोळीभोवती आरोपांचं वादळ उठलं आणि त्यातून या टोळीच्या आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे खणून काढली जात आहेत.
दहशतीला पैशाचं पाठबळ
वाल्मिक कराड आणि टोळीच्या वर्चस्वाला जसा दहशतीचा आधार आहे तसाच या दहशतीतून निर्माण झालेल्या पैशातून या टोळीने राज्यभरात जे उद्योग आणि धंदे सुरु केलेत त्यातून मिळणाऱ्या पैशांचं पाठबळ आहे. म्हणून दहशतीचं हे वर्चस्व मोडून काढायचं असेल तर या अशा आर्थिक स्रोतांवर देखील कारवाई व्हायला हवी. त्यातूनच ईडी अर्थात एन्फोर्समेंट डिरेक्टरेटच्या कारवाईची चर्चा सुरु झाली आहे.
घरकाम करणारा पोऱ्या ते कोट्यवधींचा मालक
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंकडे घरकाम करणारा पोऱ्या म्हणून वाल्मिक कराडने कामाला सुरुवात केली. पुढच्या काळात धनंजय मुंडेंचा अतिशय विश्वासू म्हणून तो ओळखला जाऊ लागला. सत्तेच्या या जवळीकीचा उपयोग करत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने कोट्यवधी रुपयांची माया जमवली. याच पैशांच्या आधारे पुण्या-मुंबईसह अनेक शहरांमध्ये वाल्मिक कराड आणि टोळीने उद्योग आणि व्यवसायांमध्ये पैसे गुंतवल्याचा आरोप होत आहे.
वाल्मिक कराड मकोकाच्या बाहेर
संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेल्या आठ जणांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मात्र वाल्मिक कराडला मकोकाच्या कारवाईतून वगळण्यात आलं. वाल्मिक कराड आणि टोळीची दहशत कायमस्वरूपी संपवायची असेल तर त्यांच्या या अशा आर्थिक स्तोत्रांवर कारवाई होण्याची गरज आहे. त्यातूनच ईडीकड़े या टोळीच्या मालमत्तांचा तपास सोपवला जाऊ शकतो असं बोललं जातंय.
दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत बीडचा क्रमांक बराच खालचा आहे. पिढ्यानपिढ्या ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांचा जिल्हा म्हणून बीड ओळखला जातोय. इतक्या वर्षात या ऊसतोड मजुरांच्या आयुष्यात फारसा बदल झालेला नाही. मात्र त्यांचं नेतृत्व करत असल्याचा दावा करणाऱ्यांची संपत्ती ही अशी गगनाला भिडल्याचं चित्र मात्र दिसून येत आहे.
ही बातमी वाचा :