Pune Navle Bridge : 'सावधान... पुढे नवले ब्रिज आहे'; पुण्यातील हटके बॅनरची शहरभर चर्चा
पुणेरी पाट्या राज्यभार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील नवले पुलावर लावलेलं हटके बॅनरही चर्चेचा विषय ठरलं आहे. हे बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील झालं आहे.
Pune Navle Bridge : पुण्यातील नवले पुलावर (Pune) मागील चार दिवसांपासून अपघाताची मालिका सुरु आहे. या अपघातांमुळे सध्या पुण्यात या पुलाची (navle Bridge) चर्चा सुरु आहे. पुणेरी पाट्या राज्यभार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील नवले पुलावर लावलेलं हटके बॅनरही चर्चेचा विषय ठरलं आहे. हे बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील झालं आहे.
जनजागृतीसाठी नवले ब्रीजच्या सुरुवातीला "सावधान नवले ब्रीज पुढे आहे" असं मजकुराचे बॅनरवर लागले आहेत. बॅनरवर लागलेले चित्र आणि मजकूर चर्चेचा विषय बनत आहे. अपघातामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये जनजागृती होण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले आहेत. नवले ब्रिजवर सेल्फी पॉईंटजवळ हे बॅनर लावण्यात आले आहेत.
चर्चा अन् दोषारोपच फार
या पुलावर आतापर्यंत अनेकदा अपघात झाले. त्यात अनेकांचा जीवही गेला. मात्र प्रशासन अजूनही झोपेत असल्याचं चित्र आहे. या पूर्वीही अनेक आश्वासनं देण्यात आली. उपययोजनांसाठी चर्चा केली. प्रशासनाकडून पाहणी अनेकदा झाली. मात्र या सातत्याने होणाऱ्या अपघाताला अजूनही आळा बसत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीकडून हे बॅनर लावण्यात आलं आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली आहेत. आंदोलनं केली आहेत. मात्र प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. या सगळ्यांमुळे अनेकांचे नाहक जीव गेले आहेत. अनेकांच्या गाड्यांचं नुकसान झालं आहे. मात्र तरीही प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. मात्र जबाबदारी म्हणून किमान हे बॅनर पाहून तरी पुणेकर सतर्क होतील आणि प्रशासन काही प्रमाणात उपाययोजना करतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे.
बॅनरवर नेमकं काय आहे?
अपघात झालेल्या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलं आहे. या बॅनरवर तीव्र उतार दाखवण्यात आला आहे. शिवाय त्यावर कावळा रेखाटण्यात आला आहे. सावधान नवले पुल पुढे आहे, असं या बॅनरवर लिहिलं आहे. या मुलावर आतापर्यंत 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघाती पूल म्हणून ओळख निर्माण झाली आहे. जांभूळवाडी तलावापासून ते नऱ्हे परिसरातील सेल्फी पॉईंटपर्यंत हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांंमध्ये या बॅनरची मोठी चर्चा होत आहे.
महापालिका अन् एनएचएआय जबाबादार
या पुलावर अपघाताची मालिका सुरुच आहे. त्यामुळे खासदार, आमदार, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी पुलाची पाहणी केली. त्यात महापालिका आयुक्त आणि एनएचएआय यासाठी जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. मात्र यात सामान्य पुणेकर भरडले जात असल्याचं चित्र आहे.