कंटेन्मेंट झोनमध्ये सोडलं नाही म्हणून पुण्यातील भाजी विक्रेत्या दाम्पत्यनं केलं विष प्राशन; महिलेचा मृत्यू, पुरुषाची प्रकृती चिंताजनक
पुण्यातील उंब्रज नंबर हे गाव कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. याच गावातील शिंगोटे दाम्पत्य तीन चाकी टमटममधून भाजी विक्री करून घरी परतत होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना हटकले आणि कंटेन्मेंट झोनमध्ये सोडण्यास मनाई केली.
पिंपरी-चिंचवड : पोलिसांनी कंटेन्मेंट झोनमध्ये सोडलं नाही, म्हणून भाजी विक्री दाम्पत्याने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे तर पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात ही घटना मंगळवारच्या सायंकाळी घडली आहे.
अनुजा शिंगोटे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव होते. उंब्रज नंबर हे गाव कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. याच गावातील शिंगोटे दाम्पत्य तीन चाकी टमटममधून भाजी विक्री करून घरी परतत होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना हटकले आणि कंटेन्मेंट झोनमध्ये सोडण्यास मनाई केली. यावरून पोलीस आणि शिंगोटे दाम्पत्यात वाद सुरू झाले. मग सरपंच, सदस्य आणि पोलीस पाटीलही घटनास्थळी आले. मग अन्य वाहन कंटेन्मेंट झोनमध्ये कसे काय सोडले जातात, असा प्रश्न शिंगोटे दाम्पत्याने केल्याने वाद आणखीच वाढला.
मग याचं शिंगोटे यांच्याकडून मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरू झालं. त्यामुळे पोलीस चांगलेच संतापले. चित्रीकरण लागलीच बंद करण्यात आलं आणि पोलिसांकडून मारहाणही झाली, असा आरोप दाम्पत्याच्या मुलाने केला आहे. त्यानंतर आता आम्हाला आत सोडलं नाही तर आम्ही विष प्राशन करून आत्महत्या करू, असा इशारा दिला. पण त्यांना कोणीच गांभीर्याने घेतले नाही. शेवटी त्यांनी टमटममधील औषधाची बाटली काढली आणि दोघांनी ते प्राशन केलं.
त्यानंतर मात्र सर्वांची धावपळ सुरू झाली. पोलिसांची गाडी बोलावून त्यांना ओतूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पुरुषाची तब्येत खालावलेली आहे. मग संतापलेल्या कुटुंबीयांनी जोपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जात नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे ओतूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनतर वरिष्ठांकडून पोलिसांची चौकशी केली जाईल, असं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.