Pune Crime News : महिलाच महिलेची वैरी! नीट काम करत नाही म्हणून महिला दिनीच सासूने केली सुनेची हत्या; पुण्यातील घटना
महिला दिनाच्या दिवशी सगळीकडे (Pune crime) महिलेचा सन्मान केला जातो. मात्र शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात महिला दिनाच्या दिवशीच सासूने सुनेचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune Crime News : महिला दिनाच्या दिवशी सगळीकडे (Pune crime) महिलेचा सन्मान केला जातो. मात्र शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात महिला दिनाच्या दिवशीच सासूने सुनेचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील सर्व कामं नीट करत नाही या क्षुल्लक कारणामुळे सूनेची हत्या केली आहे. अमानुषपणे सूनेचं डोकं आपटून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये ही घडली घटना आहे. या घटनेप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितू रवींद्र माळवी (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या प्रकरणी तिची सासू कमला प्रभुलाल माळवी (वय-49) हिला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळवी कुटुंबीय हे पुण्यातील लोहगाव परिसरात राहतात. घरात सगळे कामं करावी लागतात आणि सून घरात व्यवस्थित काम करत नाही, यावरुन दोघींमध्ये अनेकदा वादावादी व्हायची. रोजच्या वादावादीमुळे घरात कायम चिंतेचं वातावरण असायचं. दोन दिवसांपूर्वी सासू घरातील फ्रिजचा दरवाजा उघडत होती. त्यावेळी सासूचा पाय चूकून सुनेला लागला. या कारणावरुन पुन्हा एकदा दोघींमध्ये भांडणं झाली. त्यानंतर सासूचा राग अनावर झाला. तिने सून रितूला मारहाण केली, सूनेचं डोकं खाली फरशीवर आपटलं. या घटनेत रितूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
सासू-सूनेचं भांडण टोकाला
घरोघरी मातीच्या चुली म्हटलं जातं किंवा महिलाच महिलेची वैरी असते असंही म्हटलं जातं. त्याचाच अनुभव पुण्यात आला आहे. सासू सुनेच्या भांडणाच्या अनेक बातम्या आतापर्यंत आपण ऐकल्या किंवा वाचल्या आहे. मात्र सासू सूनेचं भांडण टोकाला जाऊन हत्येपर्यंत पोहचणं ही घटना धक्कादाय़क आहे. क्षुल्लक कारणावरुन अनेक कुटुंबात वादावादी होते. त्यातील प्रत्येक वादाचं रुपांतर हत्येत होतेच असं नाही मात्र या घटनेमुळे पुणे हादरलं आहे.
पुण्यात कौटुंबिक हिंसाचारात वाढ
पुण्यात कौटुंबिक हिंसाचारात वाढ होत आहे. सासरकडून होणाऱ्या अनेक महिलांना पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र अजूनही अनेक महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी पडत आहेत. अनेक महिला अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवतात मात्र अनेक महिला सगळं सहन करताना दिसतात.