Suresh Dhas: पुण्यातील मगरपट्टा सिटीत ड्रायव्हरच्या नावावर अख्खा फ्लोअर, सुरेश धसांनी सगळंच बाहेर काढलं, धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या संपत्तीचाही उल्लेख
Suresh Dhas On Dhannajay Munde : धनंजय मुंडे यांनी ड्रायव्हच्या नावावर अख्खा फ्लोअर घेतला असून, ते मुंडेंचे पैसे नाही, मग कोणाचे पैसे? आहेत, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं अपहरण करून, त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. राजकीय वर्तुळात हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. यावरून सत्तेत आणि पक्षात सोबत असलेल्या काही नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप देखील सुरू केले आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस(Suresh Dhas) यांनी या प्रकरणात अगदी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यांच्याकडून या प्रकरणात सातत्यानं आकाचा उल्लेख करण्यात येत आहे. त्यामुळे हे आका नेमके कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता. दरम्यान सुरवातीला ते फक्त आका म्हणत होते, मात्र त्यांनी आणखी आक्रमक होत आका म्हणजे वाल्मिक कराड (Walmik Karad) आहे. तर आकाचा आका हा धनंजय मुंडे आहेत, असा दावा केला आहे, तर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मुंडेंच्या संपत्तीबाबतही भाष्य केलं आहे. धनंजय मुंडे (Dhannajay Munde) यांनी ड्रायव्हच्या नावावर अख्खा फ्लोअर घेतला असून, ते मुंडेंचे पैसे नाही, मग कोणाचे पैसे? आहेत, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुरेश धस यांनी मुंडेंच्या संपत्तीबाबत बोलताना काही सवाल देखील उपस्थित केले आहेत, ते म्हणाले, पुण्यातील मगरपट्टा सिटी शेजारी कुठेतरी मोठा फ्लॅट आहे, ड्रायव्हरच्या नावावर अख्खा फ्लोअर बुक आहे, हे पैसे कोणाचे आहेत. धनंजय मुंडे साहेबांचे पैसे नाहीतर कोणाचे पैसे आहेत? आणि बऱ्याचशा प्रॉपर्टीमध्ये ज्याच्यामध्ये आमच्या इकडच्या जैन मल्टीस्टेटची चौकशी चालू आहे त्याच्या बहुतांश प्रॉपर्टी मध्ये धनंजय मुंडे यांच्या सौभाग्यवती आणि वाल्मिक कराड यांची संयुक्त नावे बऱ्याच अंशी आहेत आणि मी एसीपी कडे सुद्धा चौकशी करणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
धनंजय मुंडेंना अजित पवार पाठिशी घालत असल्याचा दावा
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना अजित पवार पाठिशी घालत असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी केली, अजितदादा राजीनामा घेतील असं मला वाटत नाही. ते त्यांनी घ्यावा का नाही तो त्यांचा प्रश्न आहे. हा प्रश्न माझ्या पक्षाचा हे नाही. माझी मागणी प्रामाणिक आहे की, त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि धनंजय मुंडे यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. हे जे खालचं साम्राज्य त्यांचं इतकं काळ कुठं साम्राज्य होऊन बसलेला आहे, की त्याच्यातून आता अंधारातील दिवा सापडायला स्वतः धनंजय मुंडेंनाच फिरावं लागणार आहे.’, असा टोला देखील सुरेश धस यांनी मुंडेंना लगावला आहे.