Sujat Ambedkar Pune Crime: सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी अॅट्रोसिटीची तक्रार घेतली नाही, कोथरुडमध्ये दलित मुलींचा छळ, सुजात आंबेडकर संतापले
Pune crime news Kothrud girl molestation: पुण्यातील तीन दलित मुलींचा कोथरुड पोलिसांनी छळ केल्याचा आरोप. पहाटे तीन वाजेपर्यंत रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर पोलीस आयुक्तालयात

Dalit girls torture by Kothrud Police: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या तपासासाठी या मुलींना कोथरुड पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. तेथील रिमांड रुममध्ये या मुलींचा पाच तास छळ करण्यात आला. यावेळी पोलिसांकडून जातीवाचक शेरेबाजी आणि मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणात मुलींनी पुण्यातील काही सामजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन दाद मागण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्याकडे फार लक्ष दिले नाही. मात्र, रविवारी रात्री रोहित पवार, सुजात आंबेडकर, प्रशांत जगताप आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या देऊन बसले. रात्री साडेतीन वाजेपर्यंत या सगळ्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु होती. तरीही पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करुन घेतलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला.
पोलीस मुलींचा छळ करतात, त्यांचा विनयभंग करतात. त्या मुली दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावर अॅट्रोसिटी करतात, जातीवाचक शिव्या देतात. पण आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस आयुक्तालयापासून सगळी पोलीस यंत्रणा अॅट्रोसिटीची साधी तक्रारही घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले. काल रात्री पुण्यातील पोलीस आयुक्तालयात रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, प्रशांत जगताप यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. या सगळ्यांनी सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा साहेब आणि अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील साहेब यांच्याशीही चर्चा केली. मात्र, पोलिसांनी मुलींच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला.
Pune crime: तुमची जातच तशी, किती जणांसोबत झोपलात, रां# आहात की लेस्बियन आहात? कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप
सोशल मीडियावर श्वेता एस व्ही या मुलीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत श्वेता एस या मुलीने या तीन मुलींसोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. तिने म्हटले की, काल रात्री छत्रपती संभाजीनगरमधील एका केसचा तपास करण्यासाठी तेथील पोलीस कोथरुडमध्ये आले होते. त्यांनी तीन दलित मुलींना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांना चौकशीसाठी नेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या तिघींना कोथरुड पोलीस ठाण्यातील वरच्या मजल्यावर असणाऱ्या रिमांड रुममध्ये पाच तास ठेवण्यात आले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.
कोथरुड पोलीस ठाण्यातील पीएसआय प्रेमा पाटील या मुलींना म्हणाल्या की, तुम्ही महार-मांगाचे ना, मग तुम्ही असचं वागणार आहे, तुम्ही वाया जाणार आहात. तुमची जात अशीच आहे, तू किती पोरांसोबत झोपल#$स, तू रां# आहेस, असे प्रेमा पाटील यांनी म्हटल्याचा आरोप आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगरचे पीएसआय कामटे यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. एका मुलीने पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर पीएसआय कामटे संतापले. या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे स्कार्फ सेम आहेत, मग तुम्ही लेस्बियन आहात का? तुम्ही दोघीही दिसताही तशाच. तुम्ही किती तोकडे कपडे घालता. तुम्ही रां# आहात का? तुम्ही दारु पीत भटकत असाल. तुला बाप नाही तर तुला तर सोडूनच दिलं असेल, असे कामटे यांनी म्हटल्याचा आरोप आहे.
यावर एका मुलीने आमचं ऐकून घ्या अशी विनवणी केली. तेव्हा कामटे यांनी म्हटले की, तू अशीच वागलीस तर एक दिवस तुझा खून होईल. उद्या तुम्हाला नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, तुमच्यासारख्या मुलींना आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही. आम्ही तुमचं करिअर बरबाद करु, अशी धमकी पीएसआय कामटेंनी मुलींना दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी हायप्रोफाईल केसचं प्रेशर आहे दाखवून या मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ गेला. यासाठी पोलिसांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा आम्ही हे प्रकरण लावून धरु, अशी मागणी श्वेता एस या तरुणीने केली आहे.
आणखी वाचा
कोथरुडमधील प्रकरण तापलं, 'त्या' 3 तरुणींशी रुपाली चाकणकरांची चर्चा; नेमकं काय घडलं?























