Tanaji Sawant: ...म्हणून ऋषिराज प्रायव्हेट प्लेन बुक करुन बँकॉकला गेला; तानाजी सावंतांच्या मोठ्या मुलाने सगळं सांगून टाकलं
Tanaji Sawant: आमदार तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी काल घडलेल्या नाट्यमय प्रसंगाबाबत एबीपी माझाला माहिती दिली आहे.

पुणे: शिवसेनेचे माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाच्या कथित अपहरणामुळे काल (सोमवारी, ता-10) पुणे शहरात खळबळ उडाली. पोलिस तपासाची चक्रे वेगात फिरली. त्यानंतर चौकशीत सावंत यांचा मुलगा आपल्या दोन मित्रांसोबत खासगी विमानाने बॅकाँकला जाणार असल्याचे उघड झाले. त्यानंतर कायदेशीर पाठपुरावा करून ते विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरवण्यात आले. दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेल्या या नाट्यावर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अखेर पडदा पडला. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे पोलिस व विमानतळ प्रशासनाची धावपळ झाली व यंत्रणेवर मोठा ताण पडला. या प्रकरणी सर्व माहिती समोर आली. दरम्यान आमदार तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी काल घडलेल्या नाट्यमय प्रसंगाबाबत एबीपी माझाला माहिती दिली आहे.
कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून...
एबीपी माझाशी बोलताना गिरीराज सावंत म्हणाले, काल जेव्हा माझा लहान भाऊ ऋषिराज सावंत याच्याशी संपर्क होत नव्हता, तेव्हा तो कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि त्यानंतरच आम्ही सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी अपहरणाची तक्रार दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील फोन करून तानाजी सावंत यांनी मदतीसाठी विनंती केली होती. नंतर आम्हाला कळालं की, तो बँकॉकला काही कामानिमित्ताने गेला आहे, अशी माहिती गिरीराज सावंत यांनी दिली आहे.
म्हणूनच न सांगता बँकॉकला निघाला
दहा दिवस अगोदरच तो दुबईला जाऊन आला होता. पुन्हा एकदा बँकॉकला का चाललाय असे घरचे विचारतील म्हणूनच त्याने घरी न सांगता प्रायव्हेट प्लेन बुक करून बँकॉकला निघाला होता. आमच्या घरात कुठलाही कौटुंबिक वाद नाही. पोलिसांनी काल ऋषीराज पुण्यात दाखल झाल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला आहे, पोलिसांना त्यांच्या पुढील तपासात देखील आम्ही सहकार्य करू. विरोधकांनी कृपया याचं राजकारण करू नये त्यांना देखील मुलं असतील, असं आवाहन गिरीराज सावंत यांनी केलं आहे.
ऋषिकेश सावंत यांचं अपहरण झाल्याचं सोशल मिडियावर व्हायरल
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश (वय 32) यांचे अपहरण झालं आहे, ते खासगी विमानाने बँकॉकला रवाना झाला आहेत, सावंत यांना मुलाचे अपहरण झाल्याचा फोन आला होता, अशा प्रकारची माहिती सोमवारी (ता. 10) दुपारनंतर सोशल मिडियावरती व्हायरल झाली होती. कार चालकाने दिलेल्या माहितीनंतर सावंत यांनी मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्याशी संपर्क न झाल्याने अखेर सावंत पोलिस आयुक्तालयात पोहचले होते. आपला मुलगा कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता परदेशात जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सावंत आणि त्याचे कुटुंबीय धास्तावले. त्यांनी त्वरित ही माहिती पुणे पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी केली होती. विमानतळासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र, अखेर सर्व माहिती समोर आली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

