Guillain Barre Syndrome: सहा वर्षाच्या मुलाची जीबीएसवर मात; समोसा खाल्ल्याने आजाराची लागण, राज्यात रुग्णसंख्या 140 वर
Guillain Barre Syndrome: पिंपरी-चिंचवडमधील सहा वर्षाच्या मुलानेगुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) वर यशस्वीरित्या मात केल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराच्या नवीन 10 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ही आता 140 वरती पोहचली आहे. यापैकी 78 रुग्ण पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. उर्वरित 26 रुग्ण पुणे महापालिका, 15 पिंपरी-चिंचवड महापालिका, 10 रुग्ण पुणे ग्रामीणमधील आहेत. इतर जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या 11 आहे. एकूण रुग्णांपैकी 45 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत, तर 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आत्तापर्यंत 25 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर मृतांची संख्या पाचवरती पोहोचली आहे. यामुळे चिंता वाढत असली तरी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील सहा वर्षाच्या मुलानेगुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) वर यशस्वीरित्या मात केल्याची माहिती समोर आली आहे.
सहा वर्षाच्या मुलाची जीबीएसवर यशस्वीरित्या मात
पिंपरी-चिंचवडमधील सहा वर्षीय मुलाला काही दिवसांपासून त्रास होऊ लागला होता. त्याला पेन्सिल देखील हातात पकडता येत नव्हती. बाहेर खाल्ल्यामुळे त्याला जुलाबाचा त्रास झाला आणि तापही आला. दोन-तीन दिवसानंतर तो अंथरुणातून उठून शौचास जाताना देखील धडपडू लागला. त्यानंतर 14 जानेवारी रोजी आपल्या लहान भावासोबत खेळत असताना तो खाली पडला आणि त्याला पुन्हा उठून उभं देखील राहता येत नव्हते. त्याला तातडीने औंध मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमचे निदान झाले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी आता त्याने जीबीएसवर यशस्वी मात केली आहे. तो आता पुर्णपणे बरा झाला आहे.
तर त्याच्या पालकांनी माहिती देताना सांगितलं की, आठवड्यापूर्वी जवळच्या दुकानातून सामोसे आणून खाल्ल्यानंतर मुलाला ताप आला आणि जुलाब झाले. संपूर्ण कुटुंबाला तसाच त्रास झाला होता. परंतु, सहा वर्षाच्या मुलाचा ताप तसाच कायम राहिला. त्याने काही दिवसांनी पाय दुखत असल्याचे सांगितले होते. बालवाडीत शिकणाऱ्या मुलाच्या शारीरिक हालचालींमध्ये बदल झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्याला औंधमधील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी एमआरआय आणि नव्र्व्ह कंडक्शन व्हिलॉसिटी टेस्टसह काही चाचण्या केल्या. या चाचण्यांमुळे त्याच्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मीळ न्यूरोलॉजिकल आजाराचे निदान झालं. त्याला व्हेंटिलेटवर हलवण्यात आलं. फुप्फुसांमध्ये थेट ऑक्सिजन पोहचण्यास मदत करण्यासाठी त्याच्या तोंडावाटे नळी टाकण्यात आली. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करत मुलावर यशस्वी उपचार केले. त्याला गंभीर परिस्थितीतून बाहेर काढले. आता तो बरा झाला आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























