Sarasbaug Tourist Depot: सारसबाग ते सिंहगड प्रवास होणार सोपा; सारसबागेजवळ नवा टुरिस्ट डेपो उभारणार
पुण्याच्या सारसबागेजवळ नवा टुरीस्ट डेपो उभारणार आहे. लहान आकाराच्या ई-बस या डेपोतून सुटणार आहे. महत्वाचं म्हणजे सारसबाग ते सिंहगड जाण्याऱ्या बस या डेपोतून सुटणार आहे.
Sarasbaug Tourist Depot: पुण्याच्या सारसबागेजवळ पीएमपी प्रशासनाअंतर्गत नवा टुरीस्ट डेपो उभारण्यात येणार आहे. सिंहगडावर जाण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातल्या नव्या गाड्या या टुरीस्ट डेपोमधून सुटणार आहे. या डेपोमुळे पुणेकरांचा सारसबाग ते सिंहगड प्रवास सोपा होणार आहे.
सिंहगड किल्ल्यावर 1 मेपासून इलेक्ट्रिक बस सेवा सुरु करण्यात आली. या बस वगळता इतर वाहनांना किल्ल्यावर प्रवेश बंद करण्यात आल्या. मात्र शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर गर्दी झाल्याने बस अपुऱ्या पडल्या.
या ई बसमुळे अनेक पर्यटकांना गडावर अडकून पडावं लागलं. ई-बसमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. ई-बसला चार्जिंगसाठी अधिक वेळ लागत असल्याने पर्यटकांना ताटकळत उभं राहावं लागलं. त्यामुळे ई-बसचा घाट कशासाठी असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. त्याचबरोबर सिंहगडाच्या सर्वात वरच्या बाजूस रस्ते अरुंद असल्याने मोठ्या बसला घाटात वळणे घेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे घाटातील हे अरुंद रस्ते रुंद करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आल्या आहेत.
सारसबागेजवळ चार्जिंग स्टेशन उभारणार-
आधीच्या डेपोलाच आता टुरीस्ट डेपो बनवणार आहे. त्यासाठी पीएपी प्रशासनाची जोरदार तयारी सुरु आहे. ई-बस असल्याने या डेपोजवळच चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. लहान आणि येणाऱ्या सगळ्या गाड्या या डेपोतून सुटणार आहे.
काही दिवसांपुर्वी सिंहगडावर जाण्यासाठी ई-बस सुरु केल्या होत्या. त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. शनिवार-रविवार सिंहगडावर प्रचंड प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. या गर्दीमुळे सेवा पुरविताना अनेकदा अडचणी आल्या. त्या अडचणींवर चर्चा करुन अडचणीचं निराकरण करण्यात येणार आहे. तसंच सारसबागेजवळ नवा टुरीस्ट डेपो साकारला जाणार आहे. या डेपोतून लहान आकाराच्या ई-बस सिंहगडावर सेवा पुरवणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.
दरम्यान, येत्या काळात जर सिंहगडावर खासगी वाहनांना बंदी केली तर पुणेकरांना सारसबागेजवळून सिंहगडावर जाण्यासाठी थेट ई-बस उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सारसबाग ते सिंहगड प्रवास सोपा होणार आहे.