Pune Rupali Patil Thombare : कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? रुपाली पाटील ठोंबरे काय म्हणाल्या?
कसबा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होणं शक्य नाही. या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने आदेश दिला तर मी तयार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं आहे.
Pune Rupali Patil Thombare : पुण्यातील कसबा मतदारसंघाची (Kasba Bypoll election) निवडणूक बिनविरोध होणं शक्य नाही. या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने आदेश दिला तर मी तयार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी केलं आहे. त्या पुण्यात माध्यामांशी बोलत होत्या. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त आहे. त्या जागेसाठी कोण उमेदवार असेल, अशा चर्चा शहरात सुरु आहे. त्यातच रुपाली पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध होणं शक्य नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
कसब्यातील जागेवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक : रुपाली पाटील ठोंबरे
कसब्यातील जागेवर निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे. त्यासंदर्भात पक्षातील वरिष्ठांना निवेदन देखील दिलं आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं ज्यांना वाटतं. ते आजपर्यंत नीट वागले नाही आहेत. त्यांनी केलेली कामं पुण्यातील नागरिकांनी बघितली आहेत. पंढरपूर आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्यावेळी विरोधकांनी निवडणुका बिनविरोध होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात ही निवडणूक कशा प्रकारे होईल हे समोर येईल, असंही त्या म्हणाल्या.
कोण कोण उत्सुक?
सध्या कॉंग्रेसने या जागेसाठी त्यांचे उमेदवार लढवण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र सध्या महाविकास आघाडीचा उमेदवार अजून पुढे आला नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून एक उमेदवार निश्चित करतील. त्यासंदर्भात चर्चा होतील आणि वरिष्ठ नेते यासंदर्भातील आदेश देतील. शिवसेनेचे संजय मोरे, राष्ट्रवादीकडून रुपाली पाटील ठोंबरे इच्छुक आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जो आमदार विकास करतो, लोकांच्या समस्या सोडवतो त्याला कसबा मतदारसंघाचे मतदार मतदान करतात. त्यामुळे कोणताही उमेदवार दिला तर कोण योग्य उमेदवार आहे हे मतदार ठरवतील, असंही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. हा पारंपारिक मतदारसंघ मानल्या जातो. मात्र यावेळीही भाजपच निवडून येईल, असं काहीही नाही त्यामुळे येणाऱ्या काळात चित्र बदललेलं दिसू शकतं, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुक्ता टिळकांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
भाजपचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक आणि पती शैलेश टिळक यांच्यासह भाजपमध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत. 2019 मध्ये सध्याचे भाजप खासदार गिरीष बापट यांनी मुक्ता टिळक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे आणि मनसेचे अजय शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना मागे टाकत मुक्ता टिळकांनी कसब्यातून विजय मिळवला होता. आता मात्र या रिक्त जागेसाठी स्थानिक नेत्यांची नावं देखील चर्चेत आहे.