पुण्यात सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद, वाहनांना प्रवेश नाहीच; वन विभाग घटनास्थळी दाखल
पुणेकरांचं आणि पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षणाचं ठिकाण असलेल्या सिंहगडचं पर्यटन पुढील काही दिवसांसाठी बद करण्यत आलं आहे
पुणे : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. विशेष म्हणजे गेल्या 32 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद गत आठवड्यात झालेल्या पावसाची झाली आहे. या पावसाचं पाणी पुण्यातील (Pune) अनेक भागांत शिरलं होतं, अनेकांच्या घरात, कॉलनीत आणि वस्त्यांमध्येही हे पाणी शिरल्याने पुणे महापालिका प्रशासन उघडं पडलं आहे. दुसरीकडे पावसाळी पर्यटनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यंटक पुण्यात येत आहेत. पुण्यातील काही निसर्सरम्य ठिकाणांना भेटीही देतात. त्यात, भुशी डॅम हेही पर्यटकांचं लक्षणीय स्थळ आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी येथे घडलेल्या दुर्घनटेनंतर पुणे जिल्ह्यातील धोक्याची पर्यटनस्थळ (Tourist), पाणी प्रवाहित असलेली ठिकाणं पर्यंटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. आता, पुण्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेला सिंहगड (Sinhagad) किल्लाही पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणेकरांचं आणि पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षणाचं ठिकाण असलेल्या सिंहगडचं पर्यटन पुढील काही दिवसांसाठी बद करण्यत आलं आहे. सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराचा मोठा भाग, मोठ्या झाडांसह कोसळून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद झाला असून वन विभागाकडून देखील दरड हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र, दगड आणि मातीचं प्रमाण मोठं असल्यानं ही दरड हटवण्यास काही दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, सिंहगड किल्ल्यावर वाहनांना तोपर्यंत जाता येणार नाही, अशी माहिती आहे.
मागील दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, या मुसळधार पावसामुळे घाट परिसरात व डोंगर,किल्ल्यांवरील प्रदेशात दरडी कोसळण्याच्य घटना घडताना दिसून येते. या आठवड्यातील पावसामुळे सिंहगडावरदेखील दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. सिंहगड किल्ल्यावरील काही भागात दरड कोसळली असून या दरडी हटविण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे, हा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.
सिंहगड किल्ला पर्यटकांचं आकर्षण
पावसाळी पर्यटनांमध्ये पुणे, लोणावळा ही शहरं प्रसिद्ध आहेत. पुण्यातील सिंहगड किल्ला हे पर्यटकांचं विशेष आकर्षण राहिला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पुणेकरांची पावले नकळत खडकवासला, सिंहगडाकडे वळतात. अनेकांना पर्यटनाचे वेध लागतात. पर्यटनस्थळांवर भटकंतीसाठी अनेकजण पसंती देतात तर काहींना ऐतिहासिक स्थळांवर जाण्याची आवड असते. अशा पर्यटकांसाठी सिंहगड हे कायम आवडीचे डेस्टिनेशन राहिलं आहे. पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या सिंहगडावर पावसाळ्याच्या दिवसांत कायम पर्यटकांची रेलचेल असते. अनेकजण सिंहगडावर जातात. मात्र कधी कधी दरड कोसळल्याने रस्ता बंद होतो. त्यामुळे पर्यटक अडकून राहिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात अशा घटना घडू नयेत म्हणून ही खबरदारी वन विभाकडून घेण्यात येत आहे.
हेही वाचा
भारताने आज पुन्हा कांस्य पदकावर कोरलं नाव; नेमबाज मनू भाकर अन् सरबज्योतसिंगने रचला इतिहास