Chinchwad Bypoll election : चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांची खेळी; उमेदवारी अर्ज अपक्ष का घेतला? बंडखोरीच्या दिशेने पाऊल टाकलं का? कलाटे म्हणतात....
शिवसेनेचे राहुल कलाटे पुन्हा 2019 ची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत आहेत. राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून घेतला आहे आणि दुसऱ्याच्या नावाने घेतला आहे.
Chinchwad Bypoll Election : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेवर अनेकांचा डोळा आहे. या जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. भाजप आणि महाविकास (chinchwad bypoll election) आघाडी कलगीतुरा रंगला आहे. त्यातच शिवसेनेचे राहुल कलाटे (Rahul Kalate) पुन्हा 2019 ची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत आहेत. राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून घेतला आहे आणि दुसऱ्याच्या नावाने घेतला आहे. कलाटे यांनी ही खबरदारी घेत सध्या स्वतःसाठी दोन पर्याय खुले ठेवले आहेत. त्यानी घेतलेल्या उमेदवारी अर्जामुळे सगळीकडे जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
कलाटे यांच्या खेळीने चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आणखी रंगत
महाविकास आघाडीत ठाकरे शिवसेनेला जागा सुटल्यास पक्षाच्या चिन्हावर आणि तिढा सुटलाच नाही तर अपक्ष अर्थात पुन्हा बंडखोरी करण्याचा पर्याय ही त्यांनी राखून ठेवला आहे. कलाटे यांच्या या खेळीने चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आणखी रंगत आणली आहे. राहुल कलाटे म्हणाले की, मी 2014 आणि 2019 मध्ये चिंचवडच्या जनतेसमोर उमेदवार म्हणून गेलो आहे. मात्र जर महाविकास आघाडीने जनतेचं काम केलं तर त्यांच्याकडून मी जनतेसमोर जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप निश्चित झालं नाही आहे. चिंचवड मतदारसंघात सर्वांचीच ताकद आहे. सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतला तर त्याचा या निवडणुकीला फायदा होणार आहे. मात्र त्यांच्या निर्णयाची मी वाट पाहणार आहे, असं राहुल कलाटे यांनी स्पष्ट केलं आहे.
2019 मध्ये बंडखोरी करत भाजपच्या लक्ष्मण जगतापांसमोर आव्हान
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. मात्र शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करुन भाजपच्या लक्ष्मण जगतापांसमोर आव्हान उभं केलं होतं. त्यावेळी राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचितचा पाठिंबा मिळवला होता. त्यामुळेच तेव्हाची लढत ही अटीतटीची झाली होती. आता कलाटे पुन्हा तीच खेळी करण्याच्या दिशेने पावलं टाकत आहेत.
...तर अपक्ष लढवण्याची शक्यता
चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी अजून कोणत्याही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही आहे. या जागेवर अनेकांचा डोळा आहे. जागेसाठी इच्छुकांची मोठी यादी आहे. महाविकास आघाडीत या जागेसाठी सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरु आहे. तिन्ही पक्षाने उमेदवारीचा दावा केला आहे. मात्र जर राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तर ते 2019 प्रमाणेच अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.