Pune Accident : मोदींच्या काळात न्यायदेखील श्रीमंतांचा गुलाम, ट्रक-बस ड्रायव्हरला जी शिक्षा ती पोर्श चालवणाऱ्या मुलाला का नाही? पुण्यातील अपघातावरून राहुल गांधींची टीका
Rahul Gandhi On Pune Accident : ट्रक किंवा बस ड्रायवरकडून चुकून अपघात झाला तर त्यांना दहा वर्षांची शिक्षा दिली जाते, पण पुण्यातील प्रकरणात मात्र वेगळंच काही घडलं असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.
मुंबई: पुण्यातील भरधाव कार दुर्घटनेप्रकरणी दोघांचा जीव गेल्यानंतर आता त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीदेखील प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्रल मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे दोन भारत निर्माण करत आहेत, ज्या ठिकाणी न्याय ही गोष्टदेखील श्रीमंतांची गुलाम झाली आहे असा सणसणीत आरोप राहुल गांधींनी केला. ट्रक ड्रायव्हर किंवा इतरांना जो न्याय दिला जातो तोच न्याय या पुण्यातील धनाड्याच्या मुलाला का दिला गेला नाही असा सवालही त्यांनी विचारला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर , ओला, उबेर ड्रायव्हर, ऑटो ड्रायव्हर यांच्याकडून जर काही चूक झाली आणि अपघातात कुणाचा चुकून मृत्यू झालाच तर त्यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावली जाते. त्याचसोबत त्यांच्याकडून चावी घेऊन ती फेकली जाते.
पण जर श्रीमंत घरातील 16-17 वर्षांचा मुलगा जर दारू पिऊन दोन लोकांची हत्या करतो, तर त्याला सांगितलं जातंय की अपघातावर निबंध लिहा, असं करा, तसं करा. त्या श्रीमंत मुलाला ज्या पद्धतीने शिक्षा म्हणून निबंध लिहायला लावला जातोय, तशा पद्धतीने त्या बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हरकडून का लिहून घेतलं जात नाही.
दोन भारत बनले आहेत, एक श्रीमंतांचा आणि एक गरिबांचा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारल्यानंतर ते म्हणतात की, मी सर्वांनाच गरीब बनवू का?
पण प्रश्न हा नाही, प्रश्न आहे तो न्यायाचा. गरिबाला एक न्याय आणि श्रीमंतांना एक न्याय असं का? न्याय हा सर्वांनाच सारखा मिळाला पाहिजे. मग तो गरीब असो वा श्रीमंत.
नरेंद्र मोदी दो हिंदुस्तान बना रहे हैं - जहां न्याय भी दौलत का मोहताज है। pic.twitter.com/uuJHvDdeRD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 21, 2024
काय आहे प्रकरण?
पुण्यातील उद्योगपती विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल याने दारू पिऊन नशेमध्ये कार चालवली आणि त्या कारच्या धडकेत दोघांना आपला जीव गमवावा लागला. वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असून तो पबमध्ये दारू प्यायला आणि नंतर नशेमध्येच असताना भरधाव वेगाने गाडी चालवली.
हा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी वेदांत अग्रवालला अटक केली. त्यावेळी तुरुंगात त्याला रॉयल ट्रीटमेंट देण्यात आल्याचं समोर आलं. दोन लोकांचा जीव घेऊन आलेल्या वेदांतला पोलिसांनी मागच्या दारातून पिझ्झा आणि बर्गर देण्यात आल्याचं समोर आलं. त्यानंतर अवघ्या 15 तासांमध्ये वेदांत अग्रवालला जामीन मंजूर करण्यात आला. त्यावरून पोलिसांवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.
सर्व स्तरातून टीकेनंतर सरकारचे आदेश
इकडे सत्ताधाऱ्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत, तर तिकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरु केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी तर थेट पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी केली. तर काँग्रेसचे स्थानिक आमदार रविंद्र धंगेकर यांनीही पुणे पोलिसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय.
दरम्यान, या प्रकरणात आरोपीचे वडील विशाल अग्रवालच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही बातमी वाचा: