Pune Shree Ram Rangoli : 40 तास, 50 कलाकारांनी मिळून साकारली 100 फूटाची प्रभू श्रीरामाची रांगोळी; कलाकृती पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी
प्रभू श्रीरामांच्या जन्मकाळापासून ते रामराज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग, 50 कलाकार, 40 तासांचा कालावधी आणि जय श्रीरामाच्या जयघोषात प्रभू श्रीरामाची 100 फूट भव्य रंगावली रमणबाग प्रशालेत साकारण्यात आली.
पुणे : प्रभू श्रीरामांच्या जन्मकाळापासून ते रामराज्याभिषेकापर्यंतचे (Pune news) ठळक प्रसंग, 50 कलाकार, 300 किलो रांगोळी, 40 तासांचा कालावधी आणि जय श्रीरामाच्या जयघोषात (Ram temple Ayodhya) प्रभू श्रीरामाची 100 फूट भव्य रंगावली नारायण (narayn peth) पेठेतील रमणबाग प्रशालेत साकारण्यात आली आहे. 'श्रीराम रंगी रंगले' उत्सवात स्वप्नपूर्तीचा जल्लोष करताना रामचरित्रावर अखंड गायन-भजन- नृत्य सादरीकरण, रामावरील चित्रप्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन आणि श्रीराम खिचडी प्रसाद वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
अनेक कारसेवकांचा सहभाग
विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती पुणे महानगर यांनी उत्सवाचे संयोजन केले आहे. तर, पूर्व संघ प्रचारक सुनील देवधर यांनी आयोजन केले आहे. यावेळी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री दादा वेदक, अध्यक्ष पांडुरंग अण्णा राऊत, प्रांत मंत्री संजय मुरदाळे, साहित्यिक राजेंद्र खेर, तबलावादक पं. रामदास पळसुले, चित्रकार चिंतामणी हसबनीस, शिल्पकार दीपक थोपटे, गायिका मंजुषा पाटील, डॉ. स्मिता महाजन, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रसार प्रमुख तुषार कुलकर्णी, संस्कार भारतीचे प्रांत महामंत्री सतीश कुलकर्णी, रंगावली संयोजक अभय दाते, श्री रामराज्य फाउंडेशनचे संस्थापक आशिष काटे आदी उपस्थित होते. आर्ट इंडिया फाऊंडेशन, श्रीरंग कलादर्पण, श्रीराम राज्य फाऊंडेशन, इतिहास प्रेमी मंडळ, सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलीन, राष्ट्राय स्वाहा संस्थानी सक्रिय सहभाग घेतला आहे.
7 हजार चौरस फूट रांगोळी
श्रीराम मंदिर, अयोध्या येथे होत असलेल्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव पुण्यात भव्य स्वरूपात साजरा होत आहे. संस्कार भारती व श्रीरंग कलादर्पण च्या कलाकारांनी प्रभू श्रीरामाची रंगावली 7 हजार चौरस फूट आकारात साकारली आहे. यामध्ये रामायणातील 7 प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. तसेच 14 भाषांमध्ये 42 वेळा विविध पद्धतीने जय श्रीराम असे रेखाटण्यात आले आहे.
याशिवाय रामचरित्रावर सांस्कृतिक कार्यक्रम, श्री रामायणावरील 125 चित्रांचे प्रदर्शन, श्रीराम खिचडी प्रसाद वाटप, प्राचीन शस्त्र आणि श्रीराम मंदिर प्रतिकृती-पुस्तके-गौ साहित्याचे प्रदर्शन अशा नानाविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या 21 जानेवारी पर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 यावेळेत नारायण पेठेतील रमणबाग प्रशालेत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आर्ट इंडिया फाऊंडेशनतर्फे 'खुला आसमान' श्री रामायणावर आधारित 125 चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातून काढलेल्या 2हजार चित्रांमधील 125 सर्वोत्कृष्ट चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचातर्फे प्राचीन 700 शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसीय उत्सवात येणा-या प्रत्येक रामभक्ताला श्रीराम खिचडी प्रसादाचे वाटप केटरिंग असोसिएशन च्या वतीने करण्यात येत आहे. उत्सवात प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातमी-
राम मंदिर आणि 'ती' 500 वर्ष, आतापर्यंत नेमकं काय झाले? वाचा एका क्लिकवर....