(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dahihandi Pune: पुण्यात शिंदे गटाची सगळ्यात मोठी दहीहंडी; दिग्गजांच्या उपस्थितीत शिंदे गट करणार शक्तिप्रदर्शन
या दहीहंडी उत्सवाला शिंदे गटाचे दिग्गज नेते मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आमदार शहाजी पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती आहे.
Dahihandi Pune: यंदा जल्लोषात दहीहंडी साजरी होणार आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा जल्लोष बघायला मिळणार आहे. यंदा पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीत राजकीय खेळी बघायला मिळणार आहे. निवडणुकीच्या तयारीला सगळेच पक्ष लागले आहेत आणि त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षाकडून दहीहंडीत मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यात सगळ्यात मोठी दहीहंडी शिंदे गटाचे नगरसेवक नाना उर्फ प्रमोद भानगिरे यांच्या मंडळाच्या माध्यमातून होणार आहे.
पुण्यातील हांडेवाडीमध्ये धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.या दहीहंडी उत्सवाला शिंदे गटाचे दिग्गज नेते मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आमदार शहाजी पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाने उठाव केल्यानंतर हा पहिलाच सार्वजनिक सण असणार आहे. या माध्यमातून जनतेपर्यंत पोचण्याचा त्यांच्या प्रयत्न असणार आहे. पुण्यातील सगळ्यात मोठी दहीहंडी शिंदे गटाकडून होणार असल्याने शहरात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
दहीहंडीत महिला पथकांचा समावेश
पुण्यातील हांडेवाडीमध्ये धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचा मोठा जल्लोष साजरा होणार आहे. दरवर्षी पुण्यात अनेक ठिकाणी गोविंदा मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आणि मोठे थर करत दहीहंडी साजरी करतात. यंदा मात्र भानगिरे यांच्या दहीहंडीत काही महिला पथकांचा देखील समावेश असल्याचं भानगिरे यांनी सांगितलं आहे. या माध्यमातून लाखोंचं बक्षिससुद्धा दिलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यंदा दहीहंडी 'दहाच्या आत'
कोरोनामुळे दोन वर्षानंतर दहीहंडी महोत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. मात्र यासाठी देखील पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. याच नियमानुसार यंदा गोविंदांना दहीहंडी साजरी करता येणार आहे. यंदा रात्री 10 वाजेपर्यंत जल्लोष करता येणार आहे. दहीहंडी उत्सव होणार आहे. यामुळे पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. मोठा फौजफाटा शहरात तैनात केला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर एसआरपीएफची तुकडी, शीघ्र कृती दल, होमगार्ड, दामिनी पथके, गुन्हे शाखा विशेष शाखेचा साध्या वेशातील बंदोबस्त असणार आहे. दरवर्षी या महोत्सवात कोणताही गुन्हा घडू नये यासाठी पोलीस तत्पर असतात. या वर्षी हा जल्लोष दोन वर्षांनी होणर आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये जास्त उत्साह बघायला मिळत आहे. त्यामुळे अधिक बंदोबस्त ठेवण्याच्या तयारीत पुणे पोलीस आहेत.